‘ती’ घरी पोहोचण्याऐवजी मृतदेहच पोहोचला 

‘ती’ घरी पोहोचण्याऐवजी मृतदेहच पोहोचला 

गोंदिया - जिल्ह्यातील देवरी (रायपूर) गावाजवळील वैनगंगा नदीत कोसळून झालेल्या विमान अपघातात ठार झालेली प्रशिक्षणार्थी वैमानिक हिमानी गुरुदयाल सिंग हिला पायलट बनविण्यासाठी आवश्‍यक असलेला शेवटच्या तासाचा सराव पूर्ण होण्यापूर्वीच काळाने ओढून  नेले. हा शेवटचा सरावाचा तास पूर्ण करून ती दिल्लीला जाणार होती. पण, तिच्याएवजी तिचा मृतदेहच नेण्याची वेळ तिच्या पालकांवर आली. विशेष म्हणजे तिचे पालकही इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करतात.

बिरसी राजीव गांधी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान देवरी (रायपूर) गावाजवळील वैनगंगा नदीत बुधवारी कोसळले. यात वरिष्ठ वैमानिक रंजन गुप्ता यांच्यासह हिमानीचा मृत्यू झाला होता. हिमानीचे हे शेवटचे तिसरे सेमिस्टर होते. साडेचार महिन्यांपूर्वी ती प्रशिक्षण केंद्रात रुजू झाली होती. पायलट होण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना विमान चालविण्याचा २०० तासांचा सराव पूर्ण करावा लागतो. हिमानीचा १९९ तासांचा सराव झाला होता. अंतिम दोनशेव्या तासाचा सराव करतानाच  हा अपघात झाला. 

बुधवारी वरिष्ठ पायलटसोबत हिमानीने उड्डाण घेतले होते. गोंदियापासून पश्‍चिमेला असलेल्या  देवरी गावाजवळून जाताना विमानात बिघाड आला. विमान वैनगंगेच्या पात्रात सुरक्षित  उतरविण्याचा प्रयत्न हिमानी व गुप्ता यांनी केला. त्या प्रयत्नात विमानाचा पंखा नदीतील पाण्याची पातळी मोजण्यासाठी लावलेल्या रोप वे च्या तारांना अडकला व हा अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अपघात होताच विमानाचे चार ते पाच तुकडे झाले. रोप-वे च्या तारांपासून एकीकडे विमानाचे मुख्य इंजिन नदीपात्रातच किमान १०० मीटर दूरपर्यंत, तर दुसरे इंजिन दुसरीकडे फेकले गेले. अपघातस्थळापासून जवळच काही महिला नदीत कपडे धुत होत्या. त्या थोडक्‍यात बचावल्या. भारतीय विमान प्राधिकरणाच्या दिल्लीतील चमूने घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली. मात्र, अद्याप विमानातील बिघाडाचे व अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

अपघातांचा इतिहास
बिरसी राजीव गांधी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमानांना अपघात होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० मध्ये येथून उडालेल्या एका विमानाचे मध्य प्रदेशातील लांजी येथे  इमरजन्सी लॅण्डिंग करावे लागले होते. त्यामुळे विमान पूर्णतः क्षतिग्रस्त झाले होते. दुसऱ्या  घटनेत १८ मार्च २०१३ रोजी एक प्रशिक्षणार्थी विमान विमानतळाच्या रन वे वरून सरळ एका वाहनात शिरले होते. तिसरा अपघात २४ डिसेंबर २०१३ मध्ये रोजी मध्य प्रदेशातील पचमढी परिसरात घडला. 

बिरसी केंद्रातील प्रशिक्षणार्थी व मूळचा रायबरेली येथील सोहेल अन्सारी याने येथील विमानतळावरूनच प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले. त्याच्या विमानाचा अपघात होऊन  सोहेलचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यापूर्वीसुद्धा बिरसीतील दोन प्रशिक्षणार्थी पायलटचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्या मृत्यूमागचेही गूढ कायम आहे. 

जुन्या विमानातून प्रशिक्षण
राजीव गांधी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांना जुन्या विमानातून प्रशिक्षण दिल्या जात आहे. आजवर घडलेल्या घटना विमानात बिघाड आल्याने घडल्या आहेत. बुधवारी (ता. २६)  घडलेली घटनाही विमानात बिघाड आल्यानेच घडली. ज्या विमानातून सराव केला जातो ते विमान जुने असल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. राजीव गांधी प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी या घटनेसंदर्भात काहीही बोलण्यास तयार नाही. 

ती तयारी शेवटचीच...
हिमानीने सरावाला जाण्यापूर्वी दिल्लीला जाण्याची तयारी केली होती. प्रशिक्षणार्थी मैत्रिणींनाही तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले होते. विमान कोसळल्याची बातमी येताच प्रशिक्षणार्थी वैमानिकांना अश्रू अनावर झाले. हिमानीच्या आईवडिलांचे मुलीने पायलट व्हावे, असे स्वप्न  होते. शेवटचा सरावाचा तास पूर्ण केल्यानंतर हिमानी पायलट बनून एकटीच विमान चालवू शकली होती. पण, काळाला ते मंजूर नव्हते. गुरुवारी दुपारी तिच्या आईवडिलांनी तिचा मृतदेह दिल्लीला नेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com