हिंगणा पोलिस ठाणे झाले 'आयएसओ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

जिल्ह्यात ठरले पहिले पोलिस ठाणे; प्रमाणपत्र वितरण सोहळा

जिल्ह्यात ठरले पहिले पोलिस ठाणे; प्रमाणपत्र वितरण सोहळा
हिंगणा - नागपूर शहर आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या हिंगणा पोलिस ठाण्याने नव्या इमारतीसह कामकाजात सुधारणा केली. "आयएसओ' मानांकनासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली. स्मार्ट पोलिस ठाणे झाल्याने "आयएसओ 9001' प्रमाणपत्र पोलिस अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात "आयएसओ' प्राप्त करणारे हिंगणा पोलिस ठाणे पहिले ठरले.

हिंगणा पोलिस ठाण्याच्या प्रांगणात सोमवारी (ता.15) "आयएसओ' प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या वेळी अप्पर पोलिस आयुक्त एस. दिघावकर, उपायुक्त दीपाली मासिरकर, अश्‍विनी पाटील, स्मार्थना पाटील, आयएसओ अंकेक्षण अधिकारी नितीन पोहाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, एमआयडीसी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सोनेगाव वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पांडे उपस्थित होते.

या वेळी पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर म्हणाल्या, स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना वर्षभरापूर्वी मांडली. हिंगणा पोलिस ठायाने मेहनत घेऊन "आयएसओ' प्रमाणपत्र मिळविले. यानंतर वाडी, सोनगाव व एमआयडीसी पोलिस ठाणेही आयएसओच्या कामाला लागले आहे. स्मार्ट पोलिस ठाणे झाल्यानंतर कामकाजात स्मार्टपणा दिसला पाहिजे. आयएसओचे अंकेक्षण दर तीन महिन्यांनी केले जाते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. पोलिस ठाण्यात नादुरुस्त वाहनांची संख्या जास्त आहे. यामुळे काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोडवावी, असे आवाहन केले.

या वेळी अप्पर पोलिस आयुक्त एस. दिघावकर म्हणाले, पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना मांडून त्याला मूर्त रूप दिले. यामुळे हिंगणा पोलिस ठाण्याला "आयएसओ' मानांकन मिळाले. याचे श्रेय पोलिस ठाण्यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. परिणामी कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांनी स्मार्ट बनणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. या वेळी आयएसओ अंकेक्षण अधिकारी नितीन पोहाणे व सोनेगावचे ठाणेदार संजय पांडे यांनीही मार्गदर्शन केले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी प्रास्ताविकात उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली "आयएसओ' प्रमाणपत्र मिळाले. 1911-12 मध्ये हिंगणा पोलिस ठाण्याची स्थापना झाली. ग्रामीणमध्ये असताना 65 कर्मचारी कार्यरत होते. आता ही संख्या 85 वर पोहोचली आहे. "आयएसओ' प्रमाणपत्र मिळविण्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने जबाबदारी पुन्हा वाढली, असल्याची माहिती त्यांनी दिली.

संचालन भारती दवने यांनी केले. आभार दुय्यम पोलिस निरीक्षक बारापात्रे यांनी मानले. आयोजनासाठी पोलिस उपनिरीक्षक जाधव, स्वाती यावले, वैभव भगत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भांडेगावकर, सचिन श्रीपाद, दिलीप ठाकरे, कमलेश ठाकरे, भारती डांगले, विनोद देशमुख, अरविंद घिये, विनोद कांबळे, विशाल भैसारे, शुभांगी धावडे, सपना शर्मा, रूपाली भुंबर, प्रशांत महाजन, मंगेश मापारी, मदन मिश्रा, राम पवार, नीलेश जवंजाळ, अशोक गाढवे, कमलेश शाहू आदींनी सहकार्य केले.

Web Title: hingana police station iso