शरद पवारांचे संकेत : मंत्रिमंडळाचा विस्तार कॉंग्रेसविना लगेचच 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, मंत्रिपद व काही महत्त्वाच्या खात्यांसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.

नागपूर  : अधिवेशन आटोपल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज, मंगळवारी नागपूर येथे दिले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांची बैठकसुद्धा घेतली. यावेळी कॉंग्रेसला निर्णय घेण्यास विलंब होत असल्यास आपण आपल्या खात्यांचे मंत्री नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांची बैठक

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा बुधवारी (ता.18) नागपूर येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ते एक दिवस आधीच दाखल झाले आहेत. त्यांनी शहरात येताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. बैठकीला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

Image may contain: 7 people, people standing

खात्यांसाठी आघाडीत रस्सीखेच 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, मंत्रिपद व काही महत्त्वाच्या खात्यांसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. काही खाती बदलवण्याची मागणीसुद्धा केली जात आहे. त्यामुळे इतक्‍या लवकर विस्तार होईल यावर कोणाचाच विश्‍वास नाही. महाआघाडीची सत्ता स्थापना झाल्यानंतरही फक्त सहा मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. सुमारे पंधरा दिवस त्यांना कुठलीच खाती देण्यात आली नव्हती. हिवाळी अधिवेशनात सरकारची अडचण होऊ नये म्हणून दोन दिवस आधी खातेवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाळणेही शक्‍य नसल्याचे बोलले जात आहे. 

कॉंग्रेसमध्ये मतभेद 

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाजूने आहेत. मात्र, कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत. दोन माजी मुख्यमंत्री तसेच अनेक माजी मंत्री पुन्हा मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्याकरिता दिल्लीची श्रेष्ठींचीसुद्धा मंजुरी घ्यावी लागणार आहे. हे बघता कॉंग्रेसचा निर्णय लवकर होण्याची शक्‍यता नाही. असे झाल्यास सेना आणि राष्ट्रवादीने विस्तार करावा, कॉंग्रेसचा जो काही निर्णय होईल, त्यानुसार त्यांच्या सोयीने विस्तार करावा, असे ठरल्याचे समजते. 

चार ऐवजी दोनच प्रभाग 

बैठकीत भाजपने आपल्या राजकीय सोयीसाठी घेतलेला निर्णय फिरविण्याचे ठरविले. त्यात प्रामुख्याने चारऐवजी दोनच प्रभाग करणे, सरपंचांची थेट निवडणूक बंद करणे आदींचा समावेश आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hints of Sharad Pawar: The expansion of the Cabinet immediately without Congress