पूनम मॉल अपघात प्रकरणी हिरचंदानी यांना अटकपूर्व जामीन

  पूनम मॉल अपघात प्रकरणी हिरचंदानी यांना अटकपूर्व जामीन
नागपूर : वर्धमाननगरमधील पूनम मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांना सत्र न्यायालयाने आज (ता. 21) अटकपूर्व जामीन मंजूर केला. पूनम मॉलच्या अपघात प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर, बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. या निर्णयामुळे एन. कुमार हिरचंदानी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
16 ऑगस्टला रात्री पूनम मॉलचे छत आणि भिंत कोसळून चौकीदार जयप्रकाश शर्मा यांचा मृत्यू झाला. तर, एका महिलेसह तिघे गंभीर जखमी झाले होते. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणात मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांच्यावर आणि व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (ता. 18) एन. कुमार यांच्या निवासस्थानी नोटीस चिपकवून त्यांना चौकशीसाठी ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, एनकुमार यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून, सोमवारी पोलिसांनी एनकुमार यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापा घालून तपासणी केली. मात्र, त्यांचा पत्ता लागला नाही.
मॉलमधील दुकानदार, परिसरातील व्यापारी, रहिवासी यांच्याकडे विचारपूस करून दुर्घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी सरकारी यंत्रणेकडूनच या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि व्हीएनआयटीला पत्र पाठवून दुर्घटना घडवून आणली काय, त्यासाठी रसायन किंवा स्फोटकांचा वापर केला काय, याची चौकशी चालवली आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना पोलिसांनी मलब्याचे नमुने पाठविले असून, मॉलचा सज्जा आणि भिंत कोणत्या कारणामुळे पडली, त्याचा अहवाल मागितला आहे. मॉलच्या दुर्घटनेने शहरभर उलटसुलट चर्चेचे मोहोळ उडवल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेतले. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांना आज अटकपूर्व जामीन मंजून केल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com