स्वाइन, डेंगीसह "स्क्रब'चा मारा 

file photo
file photo

नागपूर : मागील वर्षी स्क्रब टायफसच्या आजाराने 33 रुग्णांचे बळी घेतले, तर 201 रुग्ण आढळले होते. यंदाही स्वाइन फ्लू, डेगींच्या साथीने ऑगस्ट महिन्यापासून स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्टमध्ये अवघे पाच रुग्ण आढळले होते. मात्र, अवघ्या महिनाभरात 23 जणांना "स्क्रब टायफस' असल्याचे आढळल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे स्क्रब टायफसचा उद्रेक नागपूर जिल्ह्यातील असल्याने जोखीम अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातील 21 रुग्णांसह भोपाळ, इटारसी आणि भंडारा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 
ट्रॉम्बिक्‍युलीड माईट्‌सचे लारव्हे; ज्याला चिगर माईट्‌स म्हणतात त्याच्यातील ओरिएन्शिया सुसुगामुशी जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने स्क्रब टायफसचा धोका असतो. स्क्रब टायफसवर उपचार न घेतल्यास साधारणत: 50 टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. योग्य उपचार मिळाले नाही तर 25 टक्के रुग्णांचा मृत्यूही होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. एकट्या नागपुरात 100 रुग्णांची नोंद गतवर्षी झाली होती, तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या आजाराचे मूळ शोधण्यासाठी नागपुरात दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनआयसीडी) पथक आले होते. त्यांच्या मदतीला आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ होते. रुग्ण आढळून येणाऱ्या भागातील उंदीर पकडण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना "रॅट ट्रॅप'लावण्यात आले होते. पकडलेल्या उंदरांच्या अंगावरील चिगर माईट्‌स काढून अभ्यासही केला होता. 
संशोधन दुर्लक्षित 
गतवर्षी पावसाळा संपताच स्क्रब टायफस या आजाराचे रुग्ण कमी झाले होते. यामुळे रॅट ट्रॅप अंतर्गत पकडण्यात आलेल्या उंदरावरील संशोधन पुढे दुर्लक्षित राहिले. यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्क्रबचे रुग्ण आढळून आले. विशेष असे की, सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये अचानक स्क्रबचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, मनपाचा आरोग्य विभाग नेहमीप्रमाणेच सुस्त आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com