‘हायटेक’ नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

देशाच्या विविध राज्यांतील बाजारपेठेत असलेले शेतमालाचे दर शेतकऱ्यांना मिळवून देऊन  त्यांना चार पैसे अधिक कसे मिळतील यासाठी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने तंत्रज्ञानाची कास धरली. एवढेच नव्हे तर ऑनलाइन लिलावाची सुविधा उपलब्ध करून देत इतर बाजार समित्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.

सहकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्थान आहे. शेतमाल, फळे, भाजीपाल्याच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ आहे. विदर्भात संत्री, मिरची, धान आणि भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या सर्व मालाची विक्री बाजार समितीच्या माध्यमातून देश आणि विदेशात केली जाते. महाराष्ट्रातील मोजक्‍या बाजार समित्यांना हे साध्य झाले आहे.

जवळपास ११० हेक्‍टरवर बाजार समितीचा विस्तार आहे. धान, मिरची, संत्रा, भाजीपाला यासाठी बाजार समितीमध्ये स्वतंत्र यार्ड आहेत. बाजार समिती व्यवस्थापनाने वेळोवेळी निर्णय घेत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल या दृष्टीने प्रयत्न केले. यासाठी विविध सोयी सुविधा येथे निर्माण करून दिल्या. वर्षाकाठी २५०० कोटी रुपयांची उलाढाल या बाजार समितीतून होते. बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम तयार केले. शेतकऱ्यांसाठी निवासाची सोय करून दिली. 

बदलत्या काळानुसार बाजार समितीला आधुनिकतेचा ‘टच’ देण्यात आला. शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठांमधील भाव कळावे यासाठी ऑनलाइन माहितीची सुविधा उपलब्ध करून दिली. देशातील कुठल्याही शहरातील व्यापाऱ्यांना येथील लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन माल खरेदी करता यावा यासाठी ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांना चारपैसे अधिक मिळण्यास मदत झाली. बाजार समितीच्या आवारातच शीतगृह आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने इथेच न थांबता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण व जमिनीचे आरोग्य पत्रिका तयार करून दिल्या. त्यामुळेच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली असून शेतकऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठरत आहे.

Web Title: hitech nagpur agricultural produce market committee