होमगार्ड जवानांचा बंदोबस्त झाला ऑनलाइन

राजेश रामपूरकर-अनिल कांबळे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

होमगार्ड जवानांचा बंदोबस्त झाला ऑनलाइन
नागपूर : होमगार्डचा कारभार आतापर्यंत "आपला तो बाळा' या उक्तीप्रमाणे चालत होता. आपल्याच मर्जीतील व घरकामे करणाऱ्यांना बंदोबस्त दिला जात होता. मात्र, जवानांच्या बंदोबस्ताच्या सुविधेत पारदर्शकता आणण्यासाठी वेबवर आधारित अप्लिकेशन विकसित केले असून, एसएमएसद्वारे बंदोबस्ताची माहिती दिली जात आहे.

होमगार्ड जवानांचा बंदोबस्त झाला ऑनलाइन
नागपूर : होमगार्डचा कारभार आतापर्यंत "आपला तो बाळा' या उक्तीप्रमाणे चालत होता. आपल्याच मर्जीतील व घरकामे करणाऱ्यांना बंदोबस्त दिला जात होता. मात्र, जवानांच्या बंदोबस्ताच्या सुविधेत पारदर्शकता आणण्यासाठी वेबवर आधारित अप्लिकेशन विकसित केले असून, एसएमएसद्वारे बंदोबस्ताची माहिती दिली जात आहे.
महाराष्ट्र होमगार्डमध्ये आतापर्यंत स्थानिक वरिष्ठ मानसेवी अधिकारीच होमगार्ड जवानांना बंदोबस्ताचे वाटप करीत असत. त्यामुळे वरिष्ठांकडून पक्षपात होत असल्याच्या तक्रारी होमगार्ड मुख्यालयात होत होत्या. त्याची तपासणी केल्यानंतर अनेक ठिकाणी हे प्रकार होत असल्याचे उघडकीस आले. होमगार्ड जवानांना नियमित बंदोबस्त मिळावा व पक्षपात होऊ नये यासाठी अत्याधुनिकीकरणाचा विचार पुढे आला.
तत्कालीन राज्य होमगार्डचे महासंचालक संजय पांडे यांनीही या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार नवीन सॉफ्टवेअर विकसित केले. त्यात राज्यातील होमगार्ड जवानांचे मोबाईल क्रमांक नोंदविले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधील होमागार्डचे रिपोर्टिंग आणि बंदोबस्त कार्यचे केंद्रीकरण झाले आहे. परिणामी, होमगार्डला एसएमएसद्वारे बंदोबस्त कुठे आणि कधी आहे याचीही माहिती मोबाईलवर मिळू लागली आहे. या प्रणालीमुळे आता "रोटेशन' पद्धतीने बंदोबस्तही मिळू लागले आहेत. परिणामी जवानांना स्थानिक वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याची गरज नसल्याचेही होमागार्डने सांगितले.
मानधनचा मुद्दाही निघणार निकाली
होमगार्डला मानधन मिळण्यासाठी तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत होता. तो कमी करण्यासाठी कवायतीची हजेरी आणि बंदोबस्ताची माहिती ठेवण्याचे काम पोलिसांनाच दिले आहे. पोलिसांनीच होमगार्डचे बंदोबस्त प्रमाणपत्र जिल्हा समादेशक कार्यालयात जमा करावे अशी सूचना दिली आहे. त्यामुळे उशिरा मानधन मिळण्याचा मुद्दाही निकाली निघणार असल्याची माहिती आहे.

होमगार्ड जवानांना नियमित बंदोबस्त आणि मानधन मिळावे यासाठी अत्याधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे जवानांना एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून बंदोबस्त कुठे आहे कधी आहे याची माहिती दिली जात आहे.
- एम. एस. अहमद,
केंद्र नायक, होमगार्ड जिल्हा समादेशक कार्यालय, नागपूर.

Web Title: Home guards online