गृहमंत्री देशमुख करणार "तिचे' कन्यादान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अचलपूर तालुक्‍यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा हिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अमरावती : गृहमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी या बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व विचारपूस केली. यावेळी त्यांनी तेथील मुलांना स्वतः चुलीवर चहा तयार करून पाजला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षाचा विवाह तेथील मुलगा समीर याच्याशी ठरला आहे. वर्षाचे कन्यादान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करावे, असे श्री. पापळकर यांनी सांगताच देशमुखांनी तत्काळ होकार दिला. नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू, असे त्यांनी सांगितले. 

Image may contain: one or more people, people sitting and food
चहाचे वाटप करताना गृहमंत्री अनिल देशमुख

"ती' आता 22 वर्षांची 

या वेळी वर्षा व समीर या दोघांचे सोमवारी साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. वर्षा ही मुलगी एक दिवसाची असताना नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती. या आश्रमात तिचे पालनपोषण झाले. ती आता 22 वर्षांची आहे. श्री. पापळकर बाबा हे मतिमंद मूकबधिर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करीत आहेत, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले. 

मुलांसाठी सुधारणा आवश्‍यक 

या आश्रमात 123 विकलांग मुले आहेत. वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की नियमानुसार विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्‍यक असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले. या मागणीबाबत आपण सामाजिक न्यायमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले. 

गृहमंत्र्यांच्या स्वागतसमारंभात धक्काबुक्की 

अचलपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी (ता. 13) वज्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथलयाला भेट देण्यासाठी सायंकाळी आले होते. त्यापूर्वी परतवाडा येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जयस्तंभ चौकात स्वागत करण्यात आले. यादरम्यान अमरावती येथून आलेल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. त्यानंतर दोन्ही नेते गृहमंत्र्यांच्या ताफ्यामागे निघून गेले. 

Image may contain: one or more people, people on stage, people standing and indoor
 दर्यापूर : कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वागत करताना मान्यवर. 

राज्यात लवकरच पोलिस भरती 

गृह खात्यातील रिक्तपदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती केली जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दर्यापूर येथे सांगितले. लोकनेते स्व. जे. डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

कठोर कायदा आणण्याचा विचार 

गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, पोलिस भरतीसह विविध स्पर्धापरीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सविस्तर वाचा : लई दिसांनी भरल्यावानी रान झालंया...
 

नक्षलवादाला आळा घालणार 

अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राईम रिपोर्टनुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांनी दर्यापूर परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

कायद्याची कठोर अंमलबजावणी 

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बालमजुरी रोखण्यासाठी व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी भरीव कार्यक्रम राबविण्यात येईल. बालके ही उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सकारात्मक निर्मितीकडे वळविण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Deshmukh will make "her" Kanyadan at amravati