महिल्यांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी विदर्भ दाैऱ्यावर असताना गुरुवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील एकूणच स्थिती हाताळण्यात सत्ताधारी भाजपला आलेल्या अपयशाचा समाचार घेतला. चार वर्षात सरकारने दिलेली खोटी आश्‍वासने, महिलांची सुरक्षा, वाढती महागाई हे प्रश्‍न हाताळताना केंद्र व राज्यातील सरकार हतबल आहे.

अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. 

विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी विदर्भ दाैऱ्यावर असताना गुरुवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील एकूणच स्थिती हाताळण्यात सत्ताधारी भाजपला आलेल्या अपयशाचा समाचार घेतला. चार वर्षात सरकारने दिलेली खोटी आश्‍वासने, महिलांची सुरक्षा, वाढती महागाई हे प्रश्‍न हाताळताना केंद्र व राज्यातील सरकार हतबल आहे.

वाढत्या महागाईची झळ सर्वाधिक महिलांनाच बसली आहे. राज्यातील अनेक महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्या कुठे आहे, याचा कुणालाही पत्ता नाही. महिलांना तक्रार करण्याचीही सोय राहली नाही. पोलिस ठाण्यात न्याय मिळत नसल्याने त्यांना न्यायालयात जावे लागत असल्याचे मुंबईतील ताजे उदाहरण आहे. बुलडाणा जिल्ह्यात कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करण्याच्या चार-चार घटना घडतात. अल्पवयीन मुलींवर अत्याचार सुरू आहेत. पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेला निवस्त्र करून मारहाण केली जाते आणि त्यांना अटक करण्यापूर्वीच न्यायालयातून जामीन मिळतो. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’, कुठे आहेत या राज्याचे गृहराज्यमंत्री? त्यांना कुणी पाहिले काय? दोन-दोन गृहराज्यमंत्री आहेत, हे सांगावे लागते.

एकूणच या राज्याचील परिस्थिती किती गंभीर आहे आणि ते हाताळण्यात सरकारला कसे अपयश आले आहे, हे सांगण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशाताई मिरगे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव मंदाताई देशमुख, माजी प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पद्माताई अहेरकर, महानगराध्यक्ष रिजवाना शेख, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, माजी प्रदेश महासचिव श्रीकांत पिसे पाटील आदींची उपस्थिती होती. 

‘उज्ज्वला’ योजना फसवी -
मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली उज्ज्वला गॅस योजना फसवी आहे. वाढलेल्या गॅस दरात सिलिंडर भरणे आणि भरलेले सिलिंडर गावखेड्यात घरापर्यंत नेण्यासाठी २००-२५० रुपये खर्च करणे परवडणारे नाही. गॅस मिळाला म्हणून रॉकेल बंद झाले. त्यामुळे प्लास्टिक जाळून चुली पेटविल्या जात आहे. त्यातून महिलांचे आरोग्य धोक्यात आल्याने उज्ज्वला गॅस योजना फसवी असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister insensitive to the question of women syas chitra vagh