शिक्षणाची पुन्हा निसर्गाकडे कशी होत आहे वाटचाल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मांजरखेड कसबा : रवींद्रनाथ टागोर, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी ते स्टिव्ह जॉब्स या सर्व उत्तुंग व्यक्तिमत्त्वांमध्ये काय साम्य आहे? असा प्रश्‍न विचारला तर, उत्तर आहे यातील कोणीच नियमित शाळेत घडलेले नाही. तरी ते यशस्वी आणि प्रेरणादायी ठरले.

सध्या कोरोना व नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने "होमस्कूल' हा विषय ऐरणीवर आला असून अनेक पालक "होमस्कूल'चा पर्याय निवडत आहेत. घोकंपट्टीपासून फारकत घेतलेल्या या शिक्षणाची वाटचाल चार भिंतींकडून पुन्हा निसर्गाकडे होत आहे.
वर्ग, वेळापत्रक, परीक्षा, शिक्षकांचे दडपणविरहित वातावरण तसेच सध्याच्या काळात शाळेतील शिक्षण माफियांची वाढलेली मग्रुरी, कार्पोरेट कल्चरच्या नावाखाली वाढलेले शैक्षणिक शुल्क, मुलांची होणारी घुसमट आदी अनेक कारणांमुळे पालक होमस्कूलिंगकडे आकर्षित होत आहे.

महानगरातील अनेक पालकांनी केवळ आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी दोघांपैकी एकाने नोकरी सोडून ही जबाबदारी स्वीकारली आहे. केवळ प्रवेशासाठी महाविद्यालयाला लाखो रुपये मोजावे लागताहेत, शिवाय कोचिंगचा हिशेब वेगळाच. यातील आउटपूट काय तर पोपटपंची करणारे गुणवंत बाहेर पडत आहेत. यावर्षी कोल्हापूर येथील होमस्कूलिंग करणाऱ्या जान्हवी देशपांडे या विद्यार्थिनीने बारावीत 84 टक्के गुण संपादन केले आहेत. घरबसल्या मुले कोडिंग डिकोडिंगसह अनेक भाषा सहज अवगत करीत आहेत.

मुक्त विद्यालयांना सुवर्णकाळ
राज्यात शालेय शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे एकूण तालुकास्तरावर 543 केंद्रे उपलब्ध असून उच्च शिक्षणासाठी राज्यात व देशात मुक्त विद्यापीठ उपलब्ध आहे. त्यामुळे शाळा- महाविद्यालयांमध्ये लाखो रुपये खर्च केल्यापेक्षा मुक्त विद्यालयामार्फत अल्प खर्चात शिक्षण होत आहे. दिव्यांग, कलाकार, खेळाडू, कामगार अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी "होमस्कूल' वरदान ठरत आहे. सद्यस्थितीत स्मार्ट टॅलेंट युवक कोचिंगऐवजी प्रात्यक्षिक नैसर्गिक शिक्षणाकडे करिअर म्हणून बघत आहेत.

"शाश्‍वत'तर्फे मोफत मार्गदर्शन
मेंदूविकार तज्ज्ञांच्या मते ऑनलाइन शिक्षण हे मुलांना विविध घातक आजारांना निमंत्रण देत आहे. होमस्कूलिंग करणारे अनेक पालक समाजात आहेत, पण त्यांना एका ठिकाणी मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अशा गरजू पालकांना आम्ही मोफत मार्गदर्शन करणार असल्याचे अमरावती येथील शाश्‍वत कंसेप्ट स्कूलचे संचालक अतुल गायगोले यांनी सांगितले.
 

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com