सन्मान वाढला, पण नोकरीसाठी उपेक्षा कायमच! 

दत्ता महल्ले
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

अन्याय दूर करण्याची रास्त अपेक्षा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आट्यापाट्या खेळाडू उन्मेश जीवन शिंदे (रा. मंगरुळपीर) यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

वाशीम : आट्यापाट्या हा खेळ आजही शासन दरबारी नोकरीतील पाच टक्के आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याची रास्त अपेक्षा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आट्यापाट्या खेळाडू उन्मेश जीवन शिंदे (रा. मंगरुळपीर) यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. राज्य शासनाने रविवारी (ता.17) मुंबई येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला.

आट्यापाट्या हा शिवकालीन मैदानी, मातीतील खेळ आहे. या खेळात चपळता, प्रतिस्पर्ध्याची कोंडी करण्याचे कसब, वेग आणि डावपाच पाहणारा खेळ आहे. यासाठी कुठल्याही साहित्याची गरज भासत नाही. हा खेळ बिनखर्चिक व परिसरात खेळल्या जात असल्यामुळे, मी या खेळाकडे प्रेरीत झालो असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यांनी आट्या-पाट्यात चार राष्ट्रीय, तीन फेडरेशन कप, तीन वेस्ट झोन कप आणि 12 राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धांत दोनवेळा ते राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिले आहेत. एकवेळा महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.

हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय आट्या-पाट्या स्पर्धेतील उपांत्य सामना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चित्तथरारक झाली होती. या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकवर निर्णायक सेटमध्ये एका गुणाने विजय मिळविला असल्याची आठवण त्यांनी सांगितले. शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (2017-18) देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. हा पुरस्कार स्वीकारण्याचा जेवढा अभिमान आहे, तेवढीच खंतही असल्याचे ते म्हणाले. इतर क्रीडा प्रकारात देशासह राज्याचे नावलौकीक करणाऱ्या खेळाडूंना शासन थेट नोकरीची संधी देते. तशीच संधी आट्या- पाट्या खेळातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना दिली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

शिंदे यांच्यापूर्वी आट्या-पाट्या या क्रीडा प्रकारात मंगरुळपीर येथीलच सागर गुल्हाने (2014-15) व अमित चव्हाण (2015-16) यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. 

23 राज्यात आट्या-पाट्या -
आट्या-पाट्या हा खेळ देशातील 23 राज्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात खेळला जातो. जिल्हा संघाला राज्यात भंडारा, चंद्रपूर तर राष्ट्रीय स्तरावर पाँडेचेरी, कर्नाटक, तमीळनाडू हे तगडे आव्हाण देणारे संघ आहेत.

Web Title: Honor is increased but neglect for job is forever