esakal | कोरोनाची धास्ती; चूल पेटवावी कशी ?
sakal

बोलून बातमी शोधा

korona.jpg

एकीकडे कोरोना विषाणूंची धास्ती असताना पोटाच्या भुकेसाठी हातगाडीवर सटरफटर व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांची मात्र, पंचाईत झाली आहे. बाजारपेठेत हातगाडी घेऊन गेल्याशिवाय इलाज नाही. तर दुसरीकडे हातगाडीवरील वस्तुंना ग्राहक नाही. या परिस्थितीत सायंकाळची चूल कशी पेटवावी, ही विवंचना त्यांना सतावत आहे.

कोरोनाची धास्ती; चूल पेटवावी कशी ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : सध्या कोरोना विषाणूंच्या धास्तीने प्रशासन उपाययोजनांचा रतीब घालत आहे. जनसामान्यांमध्येही कोरोनाची धास्ती वाढली आहे. मात्र, तरीही संध्याकाळच्या भुकेसाठी हातावर पोट असणाऱ्या लघुव्यवसायीकांना रस्त्यावर यावेच लागत आहे. मात्र, ग्राहकच नसल्याने हजारो लघु व्यावसायिकांच्या भुकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याबाबीचीही दखल घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे बाजारपेठ ओस पडली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा- अबब...! रेती माफियांनी केला चक्क पोलिसांना चिरडून ठार करण्याचा प्रयत्न

हातगाडीवरही ग्राहक नाहीत
आता व्यापारी प्रतिष्ठानेही बंद ठेवावी लागणार आहेत. एकीकडे कोरोना विषाणूंची धास्ती असताना पोटाच्या भुकेसाठी हातगाडीवर सटरफटर व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांची मात्र, पंचाईत झाली आहे. बाजारपेठेत हातगाडी घेऊन गेल्याशिवाय इलाज नाही. तर दुसरीकडे हातगाडीवरील वस्तुंना ग्राहक नाही. या परिस्थितीत सायंकाळची चूल कशी पेटवावी, ही विवंचना त्यांना सतावत आहे. प्रशासनाने केलेले खबरदारीचे उपाय कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी उपयोगी असल्याचे दिसत असले तरी प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्याच्या भुकेची तजवीज करणे गरजेचे आहे.

क्लिक करा- रिकाम्यांना येथे प्रवेश बंदी; वाचा कोणी घेतलाय हा निर्णय

राशनची व्यवस्था करण्याची गरज
दारिद्र्य रेषेखालील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांना जगण्याइतपत व्यवसाय होत नाही. प्रशासनाने अशा कुटुंबाचे सर्व्हेक्षण करून त्यांना राशन मार्फत अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दरमहा 35 किलो धान्य स्वस्त धान्य दुकानातून दिले जाते. या धान्यावर गरीब कुटुंबाची आठ ते दहा दिवस सोय होते. प्रशासनाने कोरोना विषाणूंचा प्रभाव असेपर्यंत या कुटुंबांना जगण्यापूरते धान्य अतिरिक्त उपलब्ध करून दिले तर ही समस्या सुटू शकते.

शेतकऱ्यांचीही पंचाईत
सध्या जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतमाल विकता येत नाही. शेतात असलेले पीक गारपिटीने उध्वस्त केले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तारणयोजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना तत्काळ पतपुरवठा कसा होईल, अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्याबरोबरच या साथीच्या प्रभावाने उध्वस्त होत असलेले भावविश्व सावरण्याची गरज आहे.