यंदा कडक उन्हाळा अन्‌ भरपूर पाऊस! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर -  बदलत्या वातावरणामुळे यंदाचा उन्हाळा आतापर्यंतचा सर्वांत भीषण राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, त्याचवेळी अल निनोचा "इफेक्‍ट' जाणवणार नसल्याने वरुणराजाही दणक्‍यात बरसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हेही वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. 

नागपूर -  बदलत्या वातावरणामुळे यंदाचा उन्हाळा आतापर्यंतचा सर्वांत भीषण राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, त्याचवेळी अल निनोचा "इफेक्‍ट' जाणवणार नसल्याने वरुणराजाही दणक्‍यात बरसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हेही वर्ष आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. 

जागतिक हवामान दिनाच्या पूर्वसंध्येवर "सकाळ'ने यावर्षीच्या उन्हाळा व पावसाळ्याबद्दल तज्ज्ञांकडून संभाव्य अंदाज जाणून घेतला. प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा कडक उन्हाळा जाणवणार असल्याचे सांगितले. सरासरीपेक्षा अर्धा ते एक अंशाने तापमानात वाढ होणार असून, दीर्घकालीन उन्हाच्या लाटा राहण्याची दाट शक्‍यता आहे. गेल्या वर्षी तापमानाने 47.9 अंशांचा उच्चांक गाठला होता. यंदा तो विक्रम मोडीत निघाल्यास आश्‍चर्य वाटू नये. शहरीकरण, औद्योगिकीकरण, वृक्षतोड, दुचाकी व चारचाकी वाहनांचे वाढते प्रमाण इत्यादी गोष्टींचा तापमानवृद्धीवर परिणाम होत असला तरी, मानवनिर्मित मेट्रो व जागोजागी सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळेही या संकटात भर पडणार आहे. 2016 हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद करण्यात आले. हाच ट्रेंड यंदाही कायम राहण्याची पुरेपूर शक्‍यता आहे. उन्हाच्या तीव्र लाटांमुळे उष्माघातासारखे जीवघेणे आजार वाढणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी "पॅनिक' न होता आतापासून सावध राहून आवश्‍यक काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

शेतकऱ्यांसाठी "गुड न्यूज' 
ऊन तापणार असल्याने साहजिकच पावसाळाही चांगला राहण्याची शक्‍यता आहे. मॉन्सूनसंदर्भातील प्रत्यक्ष अंदाज एप्रिलमध्ये वर्तविण्यात येणार असला तरी, दुष्काळी परिस्थितीसाठी कारणीभूत ठरणारा अल निनोचा परिणाम राहणार नसल्याने यंदाही भरपूर पावसाची शक्‍यता आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने बंपर पीक झाले. त्यामुळे बळीराजा खुशीत आहे. त्यांचा हा आनंद यावर्षीसुद्धा कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

जलचक्र आले धोक्‍यात 
नैसर्गिक जलचक्रावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे जलचक्रच धोक्‍यात आले आहे. सिमेंटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि "रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम'ची नितांत आवश्‍यकता आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आता सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे असल्याचे ताठे यांनी सांगितले. 

Web Title: hot summer and a lot of hard rain this year