बिजोऱ्यात बोअरवेलमधून येते गरम पाणी

बिजोरा : बोअरवेलमधील गरम पाण्याच्या उत्सुकतेपोटी जमलेले नागरिक.
बिजोरा : बोअरवेलमधील गरम पाण्याच्या उत्सुकतेपोटी जमलेले नागरिक.

महागाव (जि. यवतमाळ) : "निसर्गाची करणी आणि नारळात पाणी', अशी म्हण प्रचलित आहे. उन्हाच्या तीव्रतेने भूगर्भातील पाणीपातळी प्रचंड खालावल्याने हातपंपांना कोरड पडली आहे. बिजोरा येथे एका बोअरवेलमधून चक्क उकळते पाणी येऊ लागल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. यामागे काय वैज्ञानिक कारण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
महागाव ते उमरखेड मार्गावरील बिजोरा येथे राष्ट्रीय मार्गाला लागूनच प्रभाकर मारोतराव राजणे यांची शेती आहे. शेतात त्यांनी व्यवसाय म्हणून ढाबा सुरू केला. बाजूलाच पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांनी पाण्यासाठी बोअरवेल खोदली. त्याच बोअरवेलचे पाणी ढाब्यावर वापरले जाते. शनिवारी (ता. 29) सकाळी सबमर्सिबल मोटरपंपाचे बटन दाबताच बोअरवेलमधून चक्क उकळते पाणी बाहेर आले. बराच वेळ मोटरपंप चालू ठेवला; तरी सातत्याने उकळते पाणी बाहेर येत होते. थोड्याच वेळात या घटनेची वार्ता पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. सुरुवातीला अगदी उकळते पाणी बोअरवेलमधून बाहेर येत असल्याने पीव्हीसी पाइपही उष्णतेमुळे नरम झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास मोहकर, सामाजिक कार्यकर्ते संभाजी मुरमुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. पाच वर्षांपासून या बोरवेलमधून सामान्यपणे थंड पाणी येत असताना शनिवारी अचानक गरम पाणी बाहेर आले.
भूगर्भात भौगोलिक बदल?
महागाव तालुक्‍यात पैनगंगा नदीकाठावरील गावांना गेल्या शुक्रवारी (ता. 21) भूकंपाचा धक्का बसला. भूगर्भात काही भौगोलिक बदल होऊन बोअरवेलमधूनसुद्धा उष्ण पाणी बाहेर येत आहे काय, अशी चर्चाही यानिमित्ताने होऊ लागली आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन गरम पाणी येण्यामागील वैज्ञानिक तथ्य शोधावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com