हॉटेल एलबीची तिजोरी फोडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : सदरमधील हॉटेल एलबीची तिजोरी गॅस कटरने फोडून त्यातून व्यवसायाचे 10 लाख 44 हजार 468 रुपये लंपास करण्यात आले. ही चोरी करण्यामागे हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारीच असण्याची शक्‍यता पोलिस व्यक्त करीत आहेत. 

नागपूर : सदरमधील हॉटेल एलबीची तिजोरी गॅस कटरने फोडून त्यातून व्यवसायाचे 10 लाख 44 हजार 468 रुपये लंपास करण्यात आले. ही चोरी करण्यामागे हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारीच असण्याची शक्‍यता पोलिस व्यक्त करीत आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या व्यवसायाचे पैसे ठेवण्यासाठी हॉटेलच्या स्टोअर रूमजवळ एक तिजोरी बसवण्यात आली आहे. ही तिजोरी अतिशय मजबूत व सुरक्षित असल्याचा समज हॉटेल मालकाचा होता. त्यामुळे रोजच्या व्यवसायाचे पैसे तिजोरीत ठेवायचे. तिजोरी हाताळण्याची परवानगी केवळ मालक व व्यवस्थापकाला होती. त्यामुळे तिजोरीच्या दिशेने कोणी भटकत नव्हते. बुधवारी मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोराने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून आतमध्ये प्रवेश केला व गॅस कटरने तिजोरी कापून ठेवलेली रक्कम लंपास केली. दुसऱ्या दिवशी व्यवस्थापक प्रवीण श्‍यामराव धार्मिक (31, रा. जागनाथ बुधवारी) हे तिजोरीतून पैसे काढून बॅंकेत जमा करण्यासाठी गेले असता तिजोरी फोडलेली दिसली. त्यांनी मालकाला माहिती दिली. मालक व व्यवस्थापनाने सर्व नोकर व वेटरची चौकशी केली. पण, कुणीही चोरीची कबुली दिली नसल्याने त्यांनी दुपारी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये केवळ सुरक्षारक्षक होता. तोही घटना घडत असताना झोपलेला असावा, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. इतक्‍या सफाईदारपणे चोरी झाल्याने सर्व परिस्थितीची माहिती असलेला हॉटेलमधील एखादा कर्मचारी असावा, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 
तिजोरीला डिजिटल पासवर्ड 
हॉटेलमधील तिजोरी ही हायटेक आहे. त्याचा डिजिटल पासवर्ड असून विनापासवर्डने तिजोरी कशी उघडली असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्यांना या तिजोरीचा पासवर्ड माहिती आहे, त्यांच्यावर संशय निर्माण झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel LB's vault broken