विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - आठवडाभरापूर्वीच शासनाने राज्यातील 40 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे सांगत गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सिंचनात सर्वाधिक वाढ झाल्याचा दावा केला. मात्र, गेल्या वर्षात विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची आकडेवारी अथवा उत्तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने शासनाच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नागपूर - आठवडाभरापूर्वीच शासनाने राज्यातील 40 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे सांगत गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सिंचनात सर्वाधिक वाढ झाल्याचा दावा केला. मात्र, गेल्या वर्षात विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची आकडेवारी अथवा उत्तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने शासनाच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे दरवर्षी जून महिन्यात एकूण सिंचन प्रकल्पांमुळे किती सिंचन निर्मिती झाली याची टक्केवारी काढली जाते. त्यानंतर ती जाहीर केली जाते. मात्र, यंदा प्रथमच शासनाने वर्षभरात सिंचन प्रकल्पांमुळे किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची आकडेवारी जाहीर केली. त्यात संपूर्ण महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून 40 लाख हेक्‍टर सिंचन झाल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांत एवढे क्षेत्र प्रथमच सिंचनाखाली आल्याचा दावा केला. त्याच आधारावर गेल्या वर्षभरात विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची माहिती विदर्भ पाटबंधारे विभागाकडून घेण्याचा प्रयत्न केला असता नवीन बाब पुढे आली. या विभागातील वरिष्ठांपासून ते कनिष्ठापर्यंत या सर्वांनाच यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ही आकेडवारी उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले. एका अधिकाऱ्याने तर शासनाने ही आकडेवारी कुठल्या आधारावर घोषित केली असा उलट सवाल केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची माहिती आपल्या अधिकारात येत नसल्याचे सांगत त्यांच्या वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडे गेले असता त्यांनी सध्यातरी विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र गेल्या वर्षभरात सिंचनाखाली आले, याची उपलब्ध नसल्याचे सांगितले. मंडळातर्फे दरवर्षी जून महिन्यात गेल्या वर्षभरात किती सिंचन निर्मिती झाली हे काढले जात असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे शासनाने गेल्या वर्षभरात 40 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा कुठल्या आधारावर केला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव 
गेल्या वर्षभरात विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची माहिती घेण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सर्वांनीच एकमेकाकडे बोट दाखविले. कुणीही यावर बोलण्यास तयार नव्हता. तर अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. 

Web Title: How many hectare areas in Vidarbha under irrigation