चहावाला संतोष कसा बनला नागपूरचा डॉन? वाचा 

अनिल कांबळे 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शहरातील इतवारी भागातील सराफा ओळीत संतोष आंबेकरचे वास्तव्य होते. संतोषचे वडील इतवारीतील सराफा दुकानासमोर दागिने चमकवून देण्याचे काम करीत होते. आठ बाय आठच्या भाड्याच्या खोलीत संतोषचे वडील इमानेइतबारे काम करीत असताना मुलगा संतोषही त्यांच्या मदतीसाठी येत होता. वडिलांसोबत दागिने चमकवून देण्याच्या कामात तो पटाईत झाला. मात्र, त्याने वडिलाच्या गल्ल्यातील पैसे चोरण्याचा सपाटा लावला. त्याच्या या सवयीमुळे वडिलांनी त्याला दुकानात येण्यास मनाई केली. 

नागपूर : संतोष आंबेकर, नाही डॉन संतोष आंबेकर. होय, नागपुरातील या डॉनचे नाव जरी कानावर पडले तरी सर्वांनाच धडकी भरते. त्याच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा नागपूरकरांना चांगल्याच ठाऊक आहेत. संतोश आंबेकरच्या उन्मादाने तर संपूर्ण पोलिस विभाग त्रस्त होता. त्यामुळे सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या डॉनच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या. मात्र त्याच्या नावाची भीती काही केल्या संपुष्टात येत नाहीये. त्यामुळे अशा या गुंडाला कायमची अद्दल घडवावी, अशी भावना जनसामान्यांची आहे. 
नागपुरात नावारूपास आलेला हा डॉन आहे तरी कोण? काय आहे त्याची कहाणी? वाचूया... 

Image may contain: 1 person, sunglasses and outdoor

शहरातील इतवारी भागातील सराफा ओळीत संतोष आंबेकरचे वास्तव्य होते. संतोषचे वडील इतवारीतील सराफा दुकानासमोर दागिने चमकवून देण्याचे काम करीत होते. आठ बाय आठच्या भाड्याच्या खोलीत संतोषचे वडील इमानेइतबारे काम करीत असताना मुलगा संतोषही त्यांच्या मदतीसाठी येत होता. वडिलांसोबत दागिने चमकवून देण्याच्या कामात तो पटाईत झाला. मात्र, त्याने वडिलाच्या गल्ल्यातील पैसे चोरण्याचा सपाटा लावला. त्याच्या या सवयीमुळे वडिलांनी त्याला दुकानात येण्यास मनाई केली. 

Image may contain: 1 person, standing

त्यानंतर सराफा ओळीतील एका चहाटपरीवर त्याला ग्राहकांना चहा देण्यासाठी 500 रुपये महिन्याने तो काम करू लागला. याच काळात त्याची ओळख वस्तीतील काही टपोरी मुलांशी झाली. दरम्यान, चहाच्या टपरीवर झालेल्या भांडणात संतोषने मित्राच्या मदतीने एका रंगदारी करणाऱ्या गुंडांचा खून केल्याची माहिती आहे. तेव्हापासून संतोष हा गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला. चहापटरीवर येणाऱ्या ग्राहकांच्या मदतीने गांजा, व्हाईटनर, दारू आणि अंमली पदार्थाशी संतोषचा संबंध आला. त्याने दारू, गांजा विक्री करून पैसे कमवण्यास सुरुवात केली. यानंतर हळूहळू त्याचा गुन्हेगारी विश्‍वातला प्रवास सुरू झाला. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

खंडणी आणि अपहरण 
झोपडपट्टीत राहणारा आंबेकर आज कोट्यवधी रुपये किंमतीच्या बंगल्यात राहत आहे. गुन्हेगारीत वचक निर्माण करण्यासाठी आंबेकरने सुरुवातीला टोळी निर्माण केली. टोळीच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देऊन तो "प्रोटेक्‍शन मनी' म्हणून सराफा व्यापारी, बिल्डर्स, भूमाफिया, गांजा-ड्रग्स विक्रेते यांच्याकडून खंडणी वसुली करीत होता. तसेच अनेकांचे अपहरण करून "गन पॉईंट'वर पैसे उकळले. अल्पावधीत त्याने लाखो रुपये कमविले. त्याच पैशातून त्याने टोळीतील युवकांच्या कुटुंबीयांचे भले करणे सुरू केले. त्यामुळे त्याची टोळी वाढत गेली तसेच त्याचा वचकही वाढत गेला. 

भूखंडावर कब्जा 
डॉन आंबेकरकडे वादग्रस्त भूखंडाचा कब्जा घेण्यासाठी सुपारी प्रकरणे येत होती. अनेक जण आंबेकरचा 10-20 लाख रुपये देऊन कोट्यवधींचे भूखंड हडपण्यासाठी वापर करीत होते. अनेक जण जिवाच्या भीतीने स्वस्त किंमतीत भूखंडांची भूमाफियांना विक्री करीत होते. अशाप्रकारे आंबेकरचे शहरभर वर्चस्व निर्माण झाले. भूखंडावर कब्जा मिळविण्यासाठी आंबेकरचा सर्रास वापर होत गेला. 

पोलिस-राजकीय वरदहस्त ? 
संतोष जेव्हा झोपडपट्‌टीतील गुन्हेगार होता, त्यावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्याच्यावर कृपादृष्टी ठेवली. त्यामुळे छुटपूट गुंड असलेल्या संतोषची हिंमत वाढली. पोलिस कर्मचाऱ्यांना वेळेवर "हप्ता' तर राजकीय नेत्यांना "फुटेज' मिळत गेल्याने एक गावगुंड आता डॉन बनला आहे. जर 20 वर्षांपूर्वीच आंबेकरची अशीच धिंड काढली असती तर आज आंबेकर डॉन झाला नसता. 

"डान्सबार'चा शौकीन "डॉन' 
संतोष आंबेकरकडे अल्पावधीत बक्‍कळ पैसा आल्यामुळे त्याला "बाई आणि बाटली'चा शौक लागला. मुंबईतील डान्स बारवर डॉनचे विशेष प्रेम होते. संतोष एका रात्रीत बारमध्ये लाखो रुपये उधळत होता. तसेच त्याच्या मुंबई, नागपूर, गोवा, दिल्ली, औरंगाबाद यासह अन्य शहरात असंख्य "गर्लफ्रेंड्‌स' आहेत. मुंबईतील जुही चंदन आणि नागपुरातील डॉ. स्वीटी यांनी तर आंबेकरविरूद्ध थेट बंड पुकारून लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 

जुगार अड्‌डे-क्रिकेट बेटिंग 
शहरात जुगार अड्‌डे किंवा क्रिकेट बुकींना व्यवसाय सुरू करायचा असल्यास पोलिसांसह डॉन आंबेकरचा आशिर्वाद घेणे गरजेचे होते. त्यामुळे शहरातील अवैध धंदा सुरू करण्यापूर्वी डॉनची भेट घेऊन "परसेंटेज' ठरविण्यात येत होते. त्यानुसार महिन्याकाठी संतोषला जुगार अड्ड्याचे संचालक आणि क्रिकेट बुकी "प्रोटेक्‍शन मनी' देत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how santosh ambekar became don of nagpur? read full story