दैनिक भत्त्यापोटी मिळतात केवळ दीडशे रुपये; कसे घडणार उपाशीपोटी खेळाडू? 

नरेंद्र चोरे
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सध्याचा भत्ता साडेचारशे किंवा पाचशे रुपये करावा, असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी विभागीय क्रीडा संचालक सुभाष रेवतकर यांनी शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यास वित्त मंत्रालयाकडून मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव खेळाडूंना दीडशे रुपयावरच भागवावे लागत आहे. भत्ता वाढविण्यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, क्रीडा मंत्रालयाने ही बाब कधीच गांभीर्याने घेतली नाही

नागपूर : खेळाडूच्या आयुष्यात पायाभूत सुविधा व दर्जेदार प्रशिक्षणासोबतच आहाराचेही तितकेच महत्त्व आहे. चांगला व सकस आहार मिळत असेल, तरच खेळाडू करिअरमध्ये उंच झेप घेऊ शकतो. मात्र, महाराष्ट्रातील खेळाडू याबाबतीत खूपच कमनशिबी ठरले आहेत. येथील खेळाडूंना दैनिक भत्त्यापोटी केवळ दीडशे रुपये मिळतात. एवढ्या पैशात जेवण, नाश्‍ता-चहा आणि निवास कदापिही शक्‍य नाही. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे खेळाडू थोडेसे पिछाडीवर आहेत. उल्लेखनीय म्हणजे, दीड दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही खेळाडूंच्या भत्त्यात एक छदामही वाढलेला नाही.
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई व जागतिक स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारसोबतच राज्यांनीही खेळ आणि खेळाडूंना आपल्या अजेंड्यावर प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षण व सोयीसुविधांवर भरमसाठ खर्च केला जात आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य याला अपवाद ठरले आहे. राज्य सरकार महाराष्ट्रीय खेळाडूंच्या बेसिक गरजाही पूर्ण करू शकत नाही. खेळाडूंना दिला जाणारा भत्ता याचे जिवंत उदाहरण आहे. राज्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रतिदिन केवळ दीडशे रुपये भत्ता दिला जातो. या भत्त्यामध्ये दोन वेळचे जेवण, नाश्‍ता-चहा व निवासाचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेता, हा भत्ता अगदीच अल्प आहे. दीडशे रुपयांमध्ये खेळाडूंमध्ये कशी काय ताकद व ऊर्जा येईल, हा प्रश्‍न आहे. त्याच्या पोटातच काही नसेल, तर तो मैदानावर चमक तरी कसा दाखवेल. खेळाचा दर्जा कसा सुधारेल, ऑलिम्पिकपटू कसे घडणार. आश्‍चर्याची बाब म्हणजे, खेळाडूंना हा भत्ता 2002 पासून मिळतो आहे. तेव्हापासून त्यात एका पैशाचीही वाढ करण्यात आलेली नाही.
सध्याचा भत्ता साडेचारशे किंवा पाचशे रुपये करावा, असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी विभागीय क्रीडा संचालक सुभाष रेवतकर यांनी शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यास वित्त मंत्रालयाकडून मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव खेळाडूंना दीडशे रुपयावरच भागवावे लागत आहे. भत्ता वाढविण्यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, क्रीडा मंत्रालयाने ही बाब कधीच गांभीर्याने घेतली नाही. शासन लक्ष देत नसले तरी, अनेक खेळाडूंनी स्वबळावर "मेडल्स' जिंकून देशासह राज्याला नावलौकिक मिळवून दिला आहे. 
हरियानात चौपट भत्ता 
महाराष्ट्र आणि हरियानाची तुलना केल्यास जमीन-अस्मानाचे अंतर दिसून येते. हरियानातील खेळाडूंना महाराष्ट्राच्या तुलनेत तब्बल चौपटपेक्षाही अधिक (सातशे रुपये) दैनंदिन भत्ता दिला जातो. तेथील शासन नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी राहते. त्यामुळेच हरियानामध्ये उत्तम "स्पोर्टस कल्चर' निर्माण होऊन, हे राज्य आज क्रीडा क्षेत्रात सर्वांत आघाडीवर आहे. पंजाब, दिल्ली व अन्य राज्यांमध्येही खेळाडूंची कदर केली जाते. 
खेळाडूंनी पुकारला होता "एल्गार' 
काही महिन्यांपूर्वी मानकापूर येथील क्रीडा प्रबोधिनीत चांगले जेवण मिळत नसल्याच्या कारणावरून प्रचंड वादळ उठले होते. प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडू-विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध एकप्रकारे "एल्गार' पुकारला होता. हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. दोषी कंत्राटदारावर कारवाई अवश्‍य करण्यात आली. परंतु, समस्या अजूनही "जैसे थे'च आहे. दीडशे रुपयांत दोनवेळचे जेवण, नाश्‍ता व चहा देणे परवडणारे नसल्याचे त्यावेळी कंत्राटदाराने म्हटले होते. खेळाडूंचा भत्ता वाढविला नाही तर, भविष्यात अशा घटना वारंवार घडतील हेही तितकेच खरे. 

खेळाडूंना मिळणारा दैनिक भत्ता निश्‍चितच कमी असल्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच यामध्ये तीनशे रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव गेल्या महिन्यातच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. लवकरच शासन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा आहे. 
-डॉ. जयप्रकाश दुबळे, क्रीडा सहसंचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will the players be prepared?