शेकडो हेक्‍टरमधील रब्बी धानपीक धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

गोंदिया / आसोली - गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे बाघ इडियाडोह प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, पाणीवाटपासंदर्भात अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे आज शेकडो हेक्‍टरातील रब्बी धानपीक धोक्‍यात आले आहेत. पाहिजे तसे पाणी न मिळाल्याने पीक संकटात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

गोंदिया / आसोली - गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे बाघ इडियाडोह प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, पाणीवाटपासंदर्भात अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे आज शेकडो हेक्‍टरातील रब्बी धानपीक धोक्‍यात आले आहेत. पाहिजे तसे पाणी न मिळाल्याने पीक संकटात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत गोंदिया व आमगाव हे उपविभाग कार्यरत आहेत. गोंदिया उपविभागातील रजेगाव, कामठा, कालीमाटी, दासगाव अशा चार ठिकाणी या वर्षी रब्बी धानपिकाचे नियोजन करण्यात आले. रजेगाव 510 हेक्‍टर, कामठा 625 हेक्‍टर, दासगाव 642 हेक्‍टर व कालीमाटी येथे 404 हेक्‍टर जमिनीवरील रब्बी धानपिकासाठी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. यातील दासगाव विभाग पाण्याकरिता संवेदनशील म्हणून गणले जाते. यात घिवारी, शिवणी, गर्रा (बु.) गर्रा (खुर्द), निलज, उमरी व माकडी या गावांचा समावेश आहे. यापैकी उमरी व माकडी वगळता एकूण 642 हेक्‍टर जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी धानपिकाची रोवणी केली. विभागाने सुरुवातीला मुबलक पाणी दिले. त्यामुळे धानपीक चांगले येईल, अशी आशा शेतकऱ्यांत होती. मात्र, मार्च महिन्यात विभागाकडून पाण्याचा अत्यल्प पुरवठा सुरू आहे. त्यामुळे घिवारी, शिवणी, गर्रा (बु.), गर्रा (खुर्द), निलज येथील शेतकऱ्यांचे रब्बी धानपीक धोक्‍यात आले आहेत. बहुतांश पीक करपले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाण्याअभावी रोवणीच केली नाही. 

पाणी द्यायचे असेल तर, मुबलक द्या, असे शेतकऱ्यांनी विभागाला सांगितले होते. त्यावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर्षी मुबलक पाणी मिळेल, याची हमी दिली होती. ऐनवेळी अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. भर उन्हाळ्यात धानपीक करपत चालल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बाघ इटियाडोह प्रकल्प विभागाने आतातरी मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

बाघ इटियाडोह प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता नाही. तरीपण काही भागात पोणी पोहोचत नसेल तर, तेथे पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. 
- वाय. एन. राठोड, उपविभागीय अभियंता, बाघ इटियाडोह प्रकल्प उपविभाग गोंदिया. 

Web Title: Hundreds of hectares Rabi crop in danger