भंडाऱ्यात शेकडो खेळाडूंना अन्नातून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

आरओचे नव्हे, टाकीतील पाणी
स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना पिण्यासाठी आरओचे नव्हे, तर सदनिकेच्या वर लागलेल्या टाकीतील पाणी पिण्यासाठी देण्यात आले, असेही अनेक मुलांनी सांगितले. हेच पाणी स्वयंपाक तयार करण्यासाठी वापरले जात आहे. जेवण व पाण्यामुळे त्रास जाणवल्यामुळे स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या दिवशीच 100 हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने आयोजनावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

भंडारा : जिल्हा क्रीडासंकुलात सुरू असलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत आयोजकांच्या गलथान कारभारामुळे शेकडो स्पर्धकांना अन्न व दूषित पाण्यातून विषबाधा झाली. यामुळे खळबळ उडाली आहे. शेकडो विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज, शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन झाले, हे विशेष. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याने पालकांनी रोष व्यक्‍त केला आहे.

22 ते 25 डिसेंबर या कालावधीत ही विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज दुपारी या क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटन संपल्यानंतर मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाल्याने काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. हळूहळू ही संख्या शंभरावर जाऊन पोहोचली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बस आणि विभागाच्या अन्य वाहनांद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने रुग्णालयाची वैद्यकीय चमू उपचाराच्या कामी लागली. विभागीय क्रीडा स्पर्धेत नागपूर आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, देवरी व भंडारा अशा आठ प्रकल्पांतील 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील 2 हजार 700 मुले, मुली व 300 शिक्षक सहभागी झाले आहेत.

या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था क्रीडासंकुलाच्या आवारात असलेल्या सदनिकांमध्ये करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी स्वयंपाक व जेवणाची व्यवस्था आहे. या सदनिका बऱ्याच दिवसांपासून धूळखात पडून होत्या. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आज सकाळी जेवण व नाश्‍ता केला. त्यानंतरच त्यांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. परंतु, प्रवासामुळे हा त्रास होत असावा, असे समजून त्यांना शिक्षकांनी गोळ्या दिल्या. परंतु, त्यानंतर हा त्रास वाढला. उद्‌घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच काही मुलांना हा त्रास जाणवू लागल्याची प्रतिक्रिया मुलांनी दिली. इतकेच नव्हेतर त्यांच्या सोबत आलेल्या काही शिक्षकांनादेखील हा त्रास जाणवला. काही शिक्षकांनासुद्धा उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते.

आरओचे नव्हे, टाकीतील पाणी
स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना पिण्यासाठी आरओचे नव्हे, तर सदनिकेच्या वर लागलेल्या टाकीतील पाणी पिण्यासाठी देण्यात आले, असेही अनेक मुलांनी सांगितले. हेच पाणी स्वयंपाक तयार करण्यासाठी वापरले जात आहे. जेवण व पाण्यामुळे त्रास जाणवल्यामुळे स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या दिवशीच 100 हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने आयोजनावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

स्पर्धेसाठी आलेले हे विद्यार्थी दूरवरचा प्रवास करून आल्यामुळे त्यांना असा त्रास जाणवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरीही भोजन व्यवस्था आणि पाणी याबाबत चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग

 

Web Title: Hundreds of players get food poisoning