शेकडो गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर : गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

नागपूर : गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
मागील दोन ते तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. शुक्रवारी (ता. दोन) रात्री जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्‍यात झाला. यामुळे लाखांदूर, नागपूर, सावरला व कन्हाळगावकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. आसगाव येथील 77, ढोरप येथील 15 व वाही येथील 20 घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे येथील 125 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पवनी तालुक्‍यात 112 तर लाखांदूर तालुक्‍यात 65 घरांची अंशत: पडझड झाली. पवनी-कोरंभी मार्गावरील विठोबा वैद्य यांच्या पोल्टीफार्ममध्ये पाणी शिरल्याने 412 कोबड्यांचा मृत्यू झाला. कोंढा येथील मुरलीधर नागपुरे यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी मोटारपंप लावून घरातील पाणी काढले. लाखांदूर तालुक्‍यातील ओपारा गावाला चार बाजूने पाण्याने वेढले आहे. तालुक्‍यातील मासळ-परसोडी व मासळ-विरली या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चौरास भागातील शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा वाढल्याने 33 दरवाजे उघडून 5,868 क्‍युमेक्‍स पाण्याचा विसर्ग केला जात आहे.यामुळे वैनगंगा दुथडी वाहत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी, नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आले. जिल्ह्यातील अंतर्गत मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्‍यातील उचली येथील भोजराज रामदास डोंगे (वय 55) नाल्यात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. मूल तालुक्‍यातील उमा नदीला पूर आल्याने बोरचांदली, राजगड, गडीसुर्ला, चार्मोशी, गोंडपिपरीकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातही नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुसद, हिमायतनगर, बिटरगाव, खरुस, मुळावा या गावांना जाणारे प्रमुख मार्ग बंद झाले असून संपर्क तुटला आहे. उमरखेड तालुक्‍यातील अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. पैनगंगा नदीकाठावरील 47 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दहागाव नाल्याला पूर आल्याने पुसद मार्ग, ढाणकीजवळील अटारी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने बिटरगाव मार्ग, ढाणकी-खरूस मार्ग, गांजेगाव-हिमायतनगर मार्ग, मुळावा मार्ग पुरामुळे सकाळपासून बंद होते.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत पावसाने दमदार हजेरी लावली. गोरेगाव, सालेकसा, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यातील शेंडा येथील देवराम दसाराम मानवटकर यांचा जनावरांचा गोठा जमीनदोस्त झाला, तर अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील केशोरी येथील खुशाल पेशने यांचे घर कोसळले.
गिरड (जि. वर्धा) परिसरातील केसलापार येथील शेतकऱ्याच्या शेतीतील गोठ्यावर वीज पडून चार बैल ठार झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of villages lost contact