चितळांची शिकार करणे भोवले; मिळाली न्यायालयीन कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्‍यातील अहेरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या संड्रा बिटातील खंड क्र. 616 मध्ये तीन चितळांची जिवंत वीजतारेच्या साहाय्याने शिकार करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपींना अहेरी न्यायालयाने सोमवारी (ता. 20) 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

गडचिरोली : अहेरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या संड्रा जंगल परिसरातील खंड क्र. 616 मध्ये जिवंत वीजतारेच्या साहाय्याने तीन चितळांची शिकार करण्यात आल्याची गुप्त माहिती अहेरी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना मिळाली होती.

या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या जंगल परिसरात रात्रीच्या सुमारास सापळा रचून आरोपी चितळाचे मांस कापून ते शिजवून खाण्याच्या तयारी असताना घटनास्थळावरून चार आरोपींना अटक केली. 

अशी आहेत आरोपींची नावे 

तिरुपती मोंडी रंगारी, रा. संड्रा, चिन्ना गंगाराम गावडे, रा. संड्रा, सचिन बाजीराव गावडे, राजू परदेशी सिडाम अशी या आरोपींची नावे आहेत; तर अन्य चार आरोपी फरार झाले. जंगलात चितळाची शिकार करणे या आरोपींना भोवले आहे. 

Image may contain: outdoor and nature

फरार आरोपींचा शोध 

सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी मनोज चव्हाण यांनी दिली. फरार झालेल्या आरोपींचा वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. 

जाणून घ्या : हवेत गोळीबार केल्याने गेला तुरुंगात, परत आल्यावर केले असे कृत्य

घटनेचा तपास सुरू 

वन्यप्राण्यांची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे; तरीही जंगल परिसरात व गावखेड्यात अनेक जण वीजतारेच्या स्पर्शाने वन्यप्राण्यांची शिकार करतात. या घटनेचा तपास पुढील तपास उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे व उपविभागीय वनाधिकारी नीलेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी चव्हाण करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunting for chital; culprit Received a MCR at gadchiroli

Tags
टॉपिकस
Topic Tags: