वन्यप्राण्यांची शिकार; टोळी गजाआड 

file photo
file photo

राजुरा (चंद्रपूर) : वन्यप्राण्यांची शिकार करणारी आंतरराज्यीय टोळीला राजुरा भरारी पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी महाराष्ट्र आणि तेलंगणातील आहेत. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि अन्य काही वस्तू पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. 
राजुरा येथील वनविभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी कोरपना तालुक्‍यातील कुसळ येथील जगदीश लिंगू जुमनाके याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरून बिबट्याचे चामडे आढळून आले. या प्रकरणाची माहिती घेताना हा बिबट तेलंगणातील आसिफाबाद जिल्ह्यातील वाकडी तालुक्‍यातील जंगलात मारून त्याचे चामडे येथे विक्रीसाठी आणण्यात आले होते. परंतु विक्री होण्यापूर्वीच वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणातील वाकडी तालुक्‍यातील पेवटा व चिचपल्ली गावातून प्रत्येकी तीन आरोपी, बंबारा गावातून एक आणि कोरपना तालुक्‍यातील कुसळ व चिंचोली येथून प्रत्येकी एक आरोपी अशा एकूण नऊ आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली. यात बिबट्याला मारणारा मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला पेवटा येथून ताब्यात घेतले. या आरोपींकडून बिबट्या, वाघ मारण्यासाठी वापरलेला लोखंडी साफळा, त्याचे दात, नख, मिशा व इतर अवयव हस्तगत करण्यात आले. हा लोखंडी सापळा बनवून देणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. या सर्व नऊ आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चंद्रपूर न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात तब्बल पंचवीस दिवस चाललेल्या या मोहिमेत तेलंगाणातील वनअधिकारी व पोलिस अधिकारी यांनी चांगले सहकार्य केले. ही कारवाई वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक पी. जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात राजुरा संरक्षण पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी फनिंद्र गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. बासनवार, गजानन इंगळे, विदेशकुमार गलगट, वनपाल विकास शिंदे, जी. बी. जाधव, वनरक्षक ओंकार थेरे, बंडू पेंदोर, एस. व्ही. सावसाकडे, उमेश जंगम, नरगेवार, पुल्लेवाड यांनी केली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com