पोलिसांच्या मारहाणीमुळेच पतीने आत्महत्या केली : पत्नीचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : आदिवासी पती-पत्नी व मुलाला चोरीच्या गुन्ह्यावरून गडचांदूर पोलिसांनी बेदम मारहाण करून गुन्हा कबूल न केल्यास पुन्हा मारण्याची धमकी दिली. याचा धसका घेऊन आदिवासी पतीने रविवारी (ता. 8) रात्रीच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना कोरपना तालुक्‍यातील उप्परवाही येथे घडली. पोलिसांनीच माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मृताच्या पत्नीने "सकाळ'शी बोलताना केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, उपरवाही गावातील सूर्यभान रामा कोडापे हे पत्नी लता कोडापे, एक मुलगा व एक मुलगी हे गरीब कुटुंब मोलमजुरी करून जीवन जगत होते. पत्नी लता कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अंबुजा सिमेंट कंपनीतील दीपक शाहू यांच्या घरी घरकामासाठी जात होती. लता स्वतःच्या घरी असताना शाहू यांनी तेथे येऊन माझ्या घरातून सोन्याची अंगठी, चेन, कानातील बाळी व रोख पाच हजार रुपये गायब आहे, ते तू चोरले आहे. मुकाट्याने परत कर अन्यथा तुझ्या नावाने पोलिसात तक्रार करतो, अशी धमकी दिली. शेवटी साहू यांनी गडचांदूर पोलिसात तक्रार दाखल करताच पीडितेच्या घराची तपासणी करून अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांचा पीसीआर घेण्यात आला. परंतु लता यांनी, मी चोरी केली नाही, साहेब मला मारु नका, असे सांगितले. दरम्यान पत्नीला भेटायला गेलेला पती व अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी पट्ट्याने बेदम मारहाण केली, असे लता यांचे म्हणने असून या सर्व प्रकारात लताच्या पतीने सायंकाळी लतासोबत बोलताना म्हटले की, आपण मोलमजुरी करून पोट भरत आहोत. शाहू यांनी आपल्यावर चोरीचा खोटा आरोप लावून तुला पोलिस स्टेशनमध्ये डांबले. तुझ्यासोबत मुलाला व मला बेदम मारहाण केली. हा आघात, पोलिसांची मारहाण व धमकी सहन न झाल्याने माझ्या पतीने विषप्राशन करून आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून आत्महत्येस प्रोत्साहित करणाऱ्या संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, चोरीचा आळ घेणाऱ्या शाहूला अटक करून त्यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा तसेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याची त्वरित उचलबांगडी करावी, अशी मागणी भारत आत्राम यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide due to police beating: Wife's accusation