पत्नीचा गळा आवळून खून; वर्षभरानंतर हत्याकांड उघडकीस 

अनिल कांबळे
रविवार, 29 जुलै 2018

प्रिती माहेरून पैसे आणत नसल्यामुळे तिचा काटा काढायचा प्लान भोजराज व त्याच्या आईवडीलांनी केला.11 सप्टेबर 2017 मध्यरात्री एक वाजता प्रितीला टॉन्सीलचा त्रास असल्याने औषध म्हणून गुंगीचे औषध दिले.

नागपूर - माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी वैद्यकीय अहवालावरून हुडकेश्‍वर पोलिसांनी पतीसह त्याच्या आई-वडीलावर गुन्हे दाखल केले. पतीला अटक केली असून अन्य दोन आरोपी पसार झाले आहेत. भोजराव पैकुजी वाकुडेकर (वय 32, रा. न्यू महालक्ष्मी नगर, नरसाळा रोड, हुडकेश्‍वर) असे अटक केलेल्या आरोपी नाव आहे. तर प्रिती भो. वाकुडकेर (वय 32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोजराज आणि प्रिती यांचा 2011 ला विवाह झाला होता. रितीरिवाजाप्रमाणे प्रितीच्या आईवडीलांनी भोजराज यांना वरदक्षिणा देण्यात आली होती. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. भोजराज याचे गांधीबाग-इतवारीत कापडाचे दुकान आहे. वडील पैकुजी विठोबाजी वाकुडेकर हा दुकान सांभाळत होता. भोजराजला नवीन कपड्याचे दुकान थाटायचे होते. त्यामुळे तो प्रितीला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता. मात्र, प्रितीच्या वडीलाची आर्थिक स्थिती हलाकीची असल्याने प्रिती पैसे आणण्यास नकार देत होती.

दरम्यान, भोजराज प्रितीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत तिला मारहाण करीत होता. सासू रेखा पैकुजी वाकुडेकर ही तिला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होती. सासरच्या मंडळीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून प्रीती माहेरी निघून गेली. पोलिसात तक्रारअर्ज दिल्यानंतर प्रिती आणि भोजराज त्यांचे समूपदेशन करण्यात आले होते. शेवटी काही नातेवाईकांनी तडजोड करीत त्यांच्या संसाराची नव्याने घडी बसवली होती. तेव्हापासून काही महिन्यांपर्यंत चांगला संसार सुरू होता. 

असा केला प्लान 
प्रिती माहेरून पैसे आणत नसल्यामुळे तिचा काटा काढायचा प्लान भोजराज व त्याच्या आईवडीलांनी केला.11 सप्टेबर 2017 मध्यरात्री एक वाजता प्रितीला टॉन्सीलचा त्रास असल्याने औषध म्हणून गुंगीचे औषध दिले. तिला गुंगी आल्यानंतर तिचे नाक आणि तोंड दाबून खून केला. त्यानंतर सर्व जण झोपी गेले. 

आजाराने मृत्यूचा बनाव 
प्रितीने टॉन्सीलचे अतिप्रमाणात औषध घेतल्यामुळे ती बेशुद्ध पडली. रात्रीच्या सुमारास कुणाच्याही लक्षात आले नाही. सकाळी तिला मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. औषधाच्या अतिप्राशनामुळेच प्रितीचा मृत्यू झाल्याचा बनाव वाकुडेकर कुटूंबियांनी केला होता. त्यामुळे हुडकेश्‍वर पोलिसांनी प्राथमिक सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

'भरोसा सेल' पुन्हा अपयशी ! 
प्रिती यांनी सासरकडून त्रास दिल्या जात असल्याची तक्रार तहसील पोलिसांकडे केली होती. त्यानंतर प्रिती आणि भोजराज यांना भरोसा सेलमध्ये समूपदेशनासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, पांढरा हत्ती ठरलेल्या भरोसा सेलमध्ये दाम्पत्यांना योग्य समुपदेशन मिळाले नाही. भरोसा सेलच्या अपयशामुळेच प्रितीला जीव गमवावा लागल्याची चर्चा आहे. 
 

Web Title: Husband killed his wife After one year the murder has revealed