गोरेपणाच्या आकर्षणापोटी पत्नीला संपविले

गोरेपणाच्या आकर्षणापोटी पत्नीला संपविले

भंडारा : ""काले हो तो क्‍या, दिलवाले है'' या चित्रपटगीताच्या ओळी कितीही दिलखेचक असल्या तरी गोऱ्या रंगाचे आकर्षण काही संपत नाही. पण नशिबाने काळीच काळी-सावळी बायकोच पदरात टाकली तर... बायकोचा हा काळा-सावळी रंग न भावल्याने एका नवरोबाने त्याच्या बायकोचे जीवन गळा आवळून संपवले. ही हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्‍यातील सालेबर्डी येथे गुरुवारी (ता. 1) घडली. मंगला भोंडे (वय 20) असे मृत पत्नीचे, तर अंकुश भोंडे (वय 28) हे आरोपी पतीचे नाव आहे.
सालेबर्डी येथील अंकुश भोंडे शेतीचे काम करतो. याच वर्षी त्याचे लग्न अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) तालुक्‍यातील देऊळगाव येथील ठाकरे कुटुंबातील मंगलासोबत झाले. मात्र, पत्नीचा रंग काळा असल्याने अंकुश तिला नेहमी मारहाण व शिवीगाळ करून छळ करीत होता. काहीही झाले तरी दुसरी गोरी बायको करायची, असे त्याने मनात ठरविले होते. याच प्रयत्नात गुरुवारी सकाळी त्याने पत्नी मंगलाचा गळा दोरीने आवळला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना लपविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मंगला आजारी होती, असे गावकऱ्यांना सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती होताच मृत मंगलाची आई रेखा ठाकरे यांनी दिघोरी (मोठी) पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल केली. मंगलाच्या काळ्या रंगावरून तिचा जावयाने अतोनात छळ केल्याचा व त्यानेच तिचा खून केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे जावयाचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी अंकुशला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. व्ही. गावंडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com