मलाच मिळणार मंत्रीमंडळात स्थान! 

file photo
file photo

गडचिरोली : राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेत हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील दोन आमदारांत रस्सीखेच सुरू आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 23 हजारांच्या फरकाने निवडून आलेले डॉ. देवराव होळी व आरमोरी विधानसभा मतदार संघातील आमदार कृष्णा गजबे हे समर्थकांसह मुंबईत डेरेदाखल आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळेल याची उत्स्कुकता लागली आहे. 
राज्यात सलग दुसऱ्यांदा भाजप-सेनेचे युती सरकार सत्तारूढ होण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महत्त्वाची खाते मिळावी यावरून सध्या दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे असताना मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी इच्छुक आमदारांकडून व वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? मिळाल्यास कोणाला ही संधी मिळणार? याचे अंदाज बांधणे सुरू आहे. 
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन पैकी भाजपची एक जागा कमी झाली असली तरी मंत्रीमंडलात एकाला तरी संधी मिळेल 
अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे आरमोरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाबूराव मडावी यांना बऱ्याच वर्षापूर्वी मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर मारोतराव कोवासे हे काही महिन्यांसाठी मंत्रिपदी विराजमान झाले होते. नंतरच्या काळात अहेरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपकडून अम्ब्रिशराव आत्राम यांना मंत्रीपद मिळाले. 
कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद अजूनही नाही 
जिल्ह्याला मिळालेल्या आतापर्यंतच्या मंत्रिपदात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद अजूनही मिळालेले नाही. बहुतांश काळ मंत्रीपद अहेरीच्या राजघराण्यातच राहिले आहे. यावेळी अहेरीचे प्रतिनिधी सत्तापक्षात नाही. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी व कृष्णा गजबे दावेदार आहेत. दोघेही सलग निवडून आले असून, राजकीय दृष्ट्या विचार करता होळी वरचढ दिसून येत आहे. सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रयत्नाने कृष्णा गजबे हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. 
उमेदवारीसारखीच स्थिती 
डॉ. होळी यांचे संघाच्या पदाधिकाऱ्यांशी जवळीक असल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपातील एक गट डॉ. होळींच्या विरोधात असल्याने त्यांना मंत्रीपद मिळू नेये यासाठी उठाठेव सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच दिसून आली तीच परिस्थितीत आताही दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे जिल्हातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
जिल्हाला मंत्रिपदाची अपेक्षा 
भाजप-सेना युतीच्या काळात गडचिरोली जिल्हाला मंत्रीपदासह जिल्ह्याचे पालकमत्रीही मिळाले होते. राजे अम्ब्रीशराव यांना गेल्या वेळी संधी देण्यात आली होती. मात्र, साडेचार वर्षांत ते प्रभाव पाडून शकले नाही. त्यामुळे निवडणुकीचे काही दिवस शिल्लक असताना आत्राम यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जिल्हाच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. त्यामुळे यंदाही राज्याच्या मंत्रिमंडलात गडचिरोली जिल्हाला संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिंचन, सुरजागड लोह प्रकल्प, गोंडवाना विद्यापीठाच्या जागेचा प्रश्‍न तसेच देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम थंडबस्त्यात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com