इडा-पीडा टळू दे, पीकपाणी बहरू दे!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गावस्तरावर मीटिंग घेऊन रोगावर कोणती औषधी वापरावी, याचे मार्गदर्शन करावे. औषधी महाग असल्याने पंचायत समितीमार्फत सबसीडीवर शासनाने औषधी उपलब्ध करून द्यावी.

- जितेंद्र पंधे, शेतकरी, अरोली

नागपूर - पावसाने जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ‘खो’ दिला होता. पाण्याअभावी पिके कशीबशी तरली. परंतु, आता रविवारपासून सुरू झालेला थुईथुई पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा संसर्ग झाल्याचे दिसून येते. कृषी अधिकाऱ्यांनी पसरणाऱ्या रोगांपासून बचावासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.  

 

मध्यंतरी १ महिना पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे खूप नुकसान झाले.

- नामदेव पाटील, शेतकरी

 

मौदा तालुक्‍यात धानावर ‘करपा’

मौदा - तालुक्‍यात मुख्यतः धान, मिरची, सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके सद्यस्थितीत शेतात आहेत. ढगाळ वातावरणामुळे धानावर करडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेतकऱ्यांनी या रोगापासून पिकाचे संरक्षण व्हावे याकरिता उपाययोजना म्हणून कीटकनाशकांचा वापर सुरू केलेला आहे. मागील वर्षी धानावर करपा रोग लागल्यामुळे पिकांचे प्रतिएकरी उत्पादनवर प्रतिकूल परिणाम झाला होता. मिरची पिकाला बोकड्याने उद्‌ध्वस्त केले होते. 

 

जोरदार पावसाची प्रतीक्षा

साळवा - रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोयाबीन, धान, मिरची, कापूस आदी पिकांना पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे  काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे उष्णता वाढलेली होती. परिणामी पिके करपू लागली होती.

 

ढगाळ वातावरण असेच जर काही दिवस राहिले तर पिकावर बुरशी येऊ शकते. 

- रघुनाथ बोरकर, शेतकरी, गुमगाव

 

सध्या कापूस आणि तुरीचे पीक उत्तम आहे.

- धनराज घटे, शेतकरी, गुमगाव

 

ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यापासून बचावाकरिता कीटकनाशकांची फवारणी सुरू केली. परंतु, पाऊस सुरू झाल्यामुळे फवारणी बंद करावी लागली.  

- अशोक राऊत, शेतकरी, निहारवाणी

 

कापूस, तुरीसाठी ‘अच्छे दिन’ 

गुमगाव - पावसाच्या लपंडावामुळे परिसरातील सोयाबीनचे अर्धे उत्पन्न कमी होईल, असे दिसून येत आहे. मात्र, ऐन पोळ्याच्या दिवशी आलेल्या पावसाने शेतकऱ्याला दिलासा दिला. सध्या गावात आणि गावाच्या आसपासच्या परिसरातील कापूस आणि तुरीची स्थिती उत्तम आहे. यावर्षी पिकावर येणारे रोगसुद्धा कमी आहे. त्यामुळे फवारणी करण्यासाठीसुद्धा शेतकऱ्याला कमी खर्च आल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु, ढगाळ वातावरण पिकासाठी रोगाची साथ घेऊन येऊ शकते. सध्या ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय झाले आहे. 

 

इतरच्या भागापेक्षा गुमगावच्या भागाची स्थिती बरी आहे. पण, पावसाचा फटका तर नक्कीच पिकावर पडलेला आहे.

- एन. वी. गहुकर, कृषी सहाय्यक, गुमगाव विभाग

 

धान पिकावर करडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. धुके पडल्यास अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. रोगांपासून बचाव करण्याकरिता गावोगावी प्रसिद्धिपत्रक लावण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड फवारणीचा सल्ला देण्यात आलेला आहे. 

- श्री. कोरे, कृषी सहायक मौदा.

 

रामटेक तालुक्‍यात सिंचनाचा प्रश्‍न

रामटेक - रविवारी आलेल्या थोड्याफार पावसामुळे शेतातील पिके टवटवीत होऊन हिरवेगार दिसायला लागली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी थोडेसे सुखावले. पण, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतातील शेततळे, विहिरी, नदी, नाले, तलाव तुडुंब भरलेले नाहीत. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळणार की नाही, पिके पिकणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव लवकर वाढणार व पुन्हा औषध फवारणीचा खर्च होईल, असे तालुक्‍यातील सोनेघाट व भिलेवाडा गावातील शेतकरी गणेश बावनकुळे, रवींद्र तुरणकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

 

आलेला पाऊस हा शेतकऱ्यांच्या पिकाला पोषक असून, पिकांना नवसंजीवनी मिळेल. भरपूर पाऊस आला, तर शेतपिकांवरील कीड नष्ट होऊन पिके रोगमुक्त होतील.

- श्री. भेलकर, कृषी अधिकारी रामटेक तालुका

जीव लागला टांगणीला

अरोल - परिसरात धानपीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यासोबत मिरची, तूर पिकाचे उत्पादन घेतले जाते. नगदी पीक असूनही पूर्व अनुभवाने सोयाबीन नावालाच आहे.  सद्यस्थितीत पीक परिस्थिती चांगली असली तरी ढगाळ वातावरणाने धान पिकावर करपा, तुडतुडा, पीक कातरणारी अळी, मिरचीवर चुरडा मुरडा रोगाची अळी, तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.

वांगी, टोमॅटोवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. मिरचीवर मागील वर्षी बोकड्या रोगाने थैमान घातले होते. यावर्षी बोकड्याचे प्रमाण कमी आहे. विविध रोंगामुळे उत्पादनक्षमता कमी होऊन उत्पादन घटणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात अत्यल्प भाव आहे. पावसाने दडी मारल्याने ओलितासाठी पेंच कालव्याचे पाणी व कृषिपंपाचा आधार असला तरी महावितरणच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. सहायक कृषी अधिकारीही परिसरात फिरकत नसल्याचे कळते.

Web Title: Ida-trouble talu De, pika pani Bahru!