महिलांची छेडछाड कराल तर  कारागृहात जाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

एकाच दिवशी विनयभंग करणाऱ्या दोषीना शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली.  यामध्ये एकास एक वर्ष, एकास पाच वर्ष भोगावी लागणार 

अकोला :  अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी दोन अल्पवयीन पीडिताना न्याय मिळाला. एका प्रकरणात दोषीस पाच वर्ष तर दुसऱ्या खटल्यात दोषीस एक वर्षाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे हे दोन्ही निकाल एकाच दिवशी लागल्याने महिलांची छेडछाड कराल तर कारागृहात जाल असा इशाराच रोडरोमिओना देण्यात आला आहे. 

 एका अल्पवयीन पीडितेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका 26 वर्षीय दोषीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलॅंड यांच्या न्यायालयाने गुरुवारी (ता.12) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. यासोबतच 22 हजार रुपये दंडही ठोठवण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.

No photo description available.
अकोटफैलमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरी झोपलेली असतांना विकास महादेव गायकवाड (रा. अकोला) हा तिच्या घरात घुसला, त्यानंतर पीडितेचा विनयभंग करून शिवीगाळ केली. पीडितेने विरोध केल्यानंतर दोषी घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन अकोटफैल पोलिसांनी आरोपी विकास गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 अ, 452, 504 तसेच पॉस्को कायद्याच्या कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास अकोटफैल पोलिसांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलॅंड यांच्या न्यायालयाने दोषीस कलम 452 अन्वये दोषी ठरवीत पाच वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा, कलम 504 अन्वये 2 वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना आणखी शिक्षा तसेच पॉस्को कायद्याच्या कलम 8 अन्वये 5 वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. या तिनही शिक्षा दोषीला सोबत भोगायच्या आहेत. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहीले. 

No photo description available.

 अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करणाऱ्यास एका वर्षाची शिक्षा
अल्पयीन पीडितेचा पाठलाग करून रस्त्यात अडविणाऱ्या एकास दोषी ठवरत एका वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा निकाल गुरुवारी (ता.12) जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने दिला.

खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोषी शेख अहमद शेख आझाद (वय 25) हा एका अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करीत होती. त्याचा हा प्रकार सातत्याने सुरूच होता. यातच 18 सप्टेंबर 2014 रोजी दोषीने अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करून त्याने पीडितेस रस्त्यात अडवून तिचा हात धरला. आणि पीडितेसोबत अश्‍लील वर्तन केले. पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितला. यावरून पीडितेच्या कुटुंबीयांनी खदान पोलिस ठाण्यांत दोषीविरुद्ध तक्रार दिला. याप्रकरणी पोलिसांनी दोषीविरुद्ध कलम 354 (ड) अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्रन्यायाधीश चौथे डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयात झाली. गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी 354 (ड) गुन्ह्यात शेख अहमद यास बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्ष साधी कैद आणि तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षाही ठोठावण्यात आली. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे पाच सक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. किरण खोत यांनी बाजू मांडली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you molastation women, you go to jail