अवैध धंदे दिसल्यास ९६८९५५४४३३ वर थेट कॉल करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नागपूर - कुठे अवैध दारू विकली जात आहे. जुगाराचे गुत्ते सुरू आहेत. हप्ते घेतले जात असल्याचे आढळल्यास थेट मला (९६८९५५४४३३) फोन करा, त्याचा तातडीने बंदोबस्त केला जाईल, असे आवाहन नवनियुक्‍त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. 

नागपूर - कुठे अवैध दारू विकली जात आहे. जुगाराचे गुत्ते सुरू आहेत. हप्ते घेतले जात असल्याचे आढळल्यास थेट मला (९६८९५५४४३३) फोन करा, त्याचा तातडीने बंदोबस्त केला जाईल, असे आवाहन नवनियुक्‍त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. 

ओला यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली जाईल. अवैध धंद्यांवर अंकुशच नव्हे तर मुळापासून उपटून टाकले जातील. सर्वप्रथम जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्या जाईल. तक्रारीची दखल संबंधित ठाणेदार घेत नसेल तर थेट मला फोन करता येईल. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर माझा मोबाईल क्रमांक नोंदविला जाईल, असेही ओला यांनी सांगितले.

दारूतस्करीवर अंकुश
चंद्रपूर आणि वर्धा या दारूबंदीच्या जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागातून तस्करी होते. काही पोलिस कर्मचाऱ्यांचे तस्करांशी ‘सेटिंग’ आहे, हे उघड सत्य आहे. मात्र, आता पोलिस कर्मचाऱ्यांचा तसेच तस्करीमध्ये सापडलेल्या आरोपींचा मोबाईल सीडीआर लोकेशन काढून कारवाई करण्यात येणार आहे. खापरखेडा, कन्हान येथून पिस्तूल-देशी कट्‌टे सप्लाय होतात. हेही आपल्याला ठाऊक आहे.

राजकीय दबावाला जुमानणार नाही
कारवाई करताना कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. सर्वप्रथम रेती माफिया आणि कोळसा माफिया यांनाच ‘टार्गेट’ केले जाईल. राजकीय पुढाऱ्यांच्या नावावर अवैध धंदे तसेच अवैध प्रवासी वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. रेती किंवा कोळसा माफियांसोबत जुळलेल्या पोलिस कर्मचारी किंवा कुणीही असो, त्यांच्यावर नजर ठेवण्यात येईल.

धार्मिक हिंसाचार होणार नाही
गोमांस वाहतूक किंवा गायींची तस्करी या दोन कारणांमुळे धार्मिक हिंसाचार होत असल्याचे निदर्शनात आले आहे. यापुढे गायीचा ट्रक पकडणे किंवा गोमांस पकडून मारहाण करणे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कुणी सामाजिक कार्यकर्ता किंवा गट असल्यास त्यांनी केवळ पोलिसांना कळवावे. कायदा हातात घेऊन मारहाण करू नये. असे केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

Web Title: If you see illegal businesses call directly at 9689 554433