नक्षल्यांचे समर्थन कराल तर याद राखा... कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदेंनी भरला दम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवण्यासाठी सरकार उद्योगवाढीवर भर देत आहे. त्यामुळे शिक्षणाची दारे खुली करून युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाईल. मात्र, नक्षलवादाला समर्थन करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असा इशारा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

गडचिरोली  : जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलिसांना शरण आलेल्या नक्षलवाद्यांशी मंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. पोलिस दलाने मागील दोन वर्षांत चांगली कामगिरी केली असून नक्षल निर्मूलनासाठी त्यांची मदत होत आहे. शासन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. परंतु नक्षलवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला. 

विविध योजनांचा घेतला आढावा 

जिल्ह्यात सिंचन वाढ, उद्योग सुरू करण्यावर आपला भर राहणार आहे. वनऔषधीपासून प्रक्रिया उद्योग सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, आमदार धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते. 
 

Image may contain: 1 person, standing, tree and outdoor
गडचिरोली : पोलिसांना शरण आलेल्या नक्षलवाद्यांशी चर्चा करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे.

पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घ्या 

शिंदे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोणताही निधी परत जाणार नाही, याची काळजी सर्व विभागांनी घ्यावी. तुमच्या अडचणी सांगा, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि विकासात्मक कामे मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

असे का घडले? : काका गेले कामाला, काकू होती आजारी अन् पुतण्याने ओलांडली सीमा...

अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई 

जिल्ह्यातील वीज प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही कित्येक गावात वीज पोहोचलेली नाही. त्यासाठी आवश्‍यक योजना तयार करा, शासनाकडून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल. या जिल्ह्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी रुजू होण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you support the naxalism, remember ... Cabinet Minister Eknath Shinde warning