esakal | अवैध सावकाराच्या दुकान, निवासस्थानी धाडसत्र
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अवैध सावकाराच्या दुकान, निवासस्थानी धाडसत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरुड (अमरावती) : शहरासह तालुक्‍यात अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित अवैध सावकारांवर सहकार विभागाच्या वतीने एकाचवेळी सात ठिकाणी छापा मारण्यात आला. यावेळी शेकडो धनादेश आणि कोट्यवधींच्या व्यवहाराचे दस्तऐवज सहकार विभागाने जप्त केले.
गेल्या वर्षभरापासून वरुडच्या सहायक निबंधक कार्यालयात विविध अवैध सावकारांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत जिल्हा निबंधक संदीप जाधव यांचे मार्गदर्शनाखाली काल (ता. 23) दिवसभर वरुड शहर, सुरळी आणि बेनोडा (शहीद) या ठिकाणी एकाचवेळी वेगवेगळ्या पथकांनी धाडसत्र राबविले. या धाडसत्रात निखिल दामोधर अनासाने (सुरळी), शहरातील मेन रोड वरील मेहेर ज्वेलर्सचे संचालक नीलेश दामोधर अनासाने, दीपेश खेरडे, भवानी चौक परिसरातील प्रवीण खेरडे, भीमराव तुडाराम रा. प्रकाश कासुर्दे यांचे निवासस्थान मूलताई रोड वरुड, प्रकाश रामटेके व अनिता टिकमसिंह चौधरी रा. बेनोडा (शहीद) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 च्या तरतुदीनुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो कोरे आणि रकमा लिहिलेले धनादेश, कोट्यवधींचा व्यवहार असलेले अनेक गहाणखत, खरेदीखत, स्थावर मालमत्ता तसेच शेती व प्लॉटचे दस्तऐवज जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम च्या तरतुदीनुसार वरुड कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्यावरून गैरअर्जदाराच्या प्रतिष्ठान व निवासस्थानी पथकाने वरुड व बेनोडा (शहीद) पोलिस बंदोबस्तात ठिकाणी एकाच वेळेस धाड टाकून काही संशयास्पद दस्तऐवज जप्त करून सीलबंद केले. गेल्या दोन महिन्यांत वरुड तालुक्‍यात राबविण्यात आलेले हे दुसरे धाडसत्र आहे, यापूर्वी चिंचगव्हाण येथे पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर चिंचरगव्हाण आणि राजुरा बाजार येथेसुद्धा अशाच प्रकारचे धाडसत्र राबविण्यात आले होते.

loading image
go to top