यवतमाळमध्ये अनधिकृत खताची विक्री, युरियासाठीचे १७ जणांचे परवाने तात्पुरते रद्द

चेतन देशमुख
Monday, 9 November 2020

कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या आदेशाने कृषी विभागाने युरिया खताचा गैरवापर व संशयास्पदरीत्या झालेल्या विक्रीविरोधात मोहीम उघडली आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काही कृषी सेवा केंद्रचालक आणखीन अडचणीत आणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

यवतमाळ : शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात विक्रीसाठी केंद्र शासनाच्या अनुदानातून येणाऱ्या युरिया खताची संशयास्पदरीत्या विक्री करण्यात आली होती. याविरोधात कृषी विभागाने कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 17 परवाने निलंबित (लायसन्स सस्पेड) करण्यात आले आहेत. त्यातील दोन जणांनी अनधिकृतपणे खताची विक्री केल्याने त्यांचे परवानेदेखील कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या आदेशाने कृषी विभागाने युरिया खताचा गैरवापर व संशयास्पदरीत्या झालेल्या विक्रीविरोधात मोहीम उघडली आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काही कृषी सेवा केंद्रचालक आणखीन अडचणीत आणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच कृषी आयुक्तांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयानेही जिल्हाभरात तपासणी मोहीम राबविली. अनुदानातून येणाऱ्या युरियाची खरीप हंगामात अनधिकृतपणे विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यातही या प्रकरणात 15 युरिया परवानाधारकांनी संशयास्पद विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच जिल्ह्यातील 15 युरिया विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आलेत. दिग्रस व नेर या तालुक्‍यांतील दोन परवानाधारकांनी अनधिकृतपणे खतांची विक्री केल्याचेही उघड झाले. त्यामुळे या दोन ठिकाणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात निकृष्टदर्जाचे सोयाबीन बियाणे विक्री केल्याबद्दल तीन हजारांवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामधील काहींना नोटीस बजावल्या आहेत. काहींची सुनावणी झाली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर काही कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. यातच आता युरियामध्ये संशयास्पद व्यवहार केल्या प्रकरणातही कारवाई सुरू झाली आहे. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

आधीच शेतकरी अडचणीत आहेत. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर खरीप हंगामातही बोगस बियाणे, कमी, जास्त  पाऊस, पीक आल्यानंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकुळ त्यामुळेच सोयाबीन व कापूस ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेलेली आहेत. अशा अडचणीत शेतकरी असतानाही अनुदानावर आलेल्या युरिया खताची संशयास्पद विक्री करणे अनेकांना भोवले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक व गुणनियंत्रक विभागाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा - नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपकडून संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर

अनेकांवर टांगती तलवार -
युरिया खताची सर्वाधिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विक्री व्यवहाराची तपासणी मोहिमदेखील राबविण्यात आली आहे. या तपासणीनंतर 15 विक्रेत्यांच्या व्यवहारात संशयास्पद बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळेच ज्यांच्या व्यवहारात तफावत आढळून आली आहे, अशांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कृषी विभागाने कारवाईचे हत्यार उपसल्याने आता संबंधित अनेकांचे धाबे दणाणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal selling of urea in yavatmal