अवैध वृक्षतोड अन् त्यावरही अशी केली मुजोरी; वाचा काय घडले असे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

जंगलात लाकडे तोडण्याचा आवाज आला. त्यामुळे वनरक्षकांनी पाहणी केली असता, तीन इसम कुऱ्हाडीने सागवान झाडे तोडताना दिसून आले. 

मालेगाव (जि.वाशीम) : तालुक्यातील मेडशी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवठाणा खांब येथील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड करणाऱ्यांनी कर्तव्यावरील वनकर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी वनरक्षक गोपाल बोबडे यांच्या फिर्यादीवरून बार्शिटाकळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार बुधवारी (ता.15) वनरक्षक गोपाल बोबडे, आर. बी. चिंतलवाड, ए. यू. राठोड, व्ही. के. काळुशे हे कर्मचारी देवठाणा खांब भाग दोन मधील कक्ष क्रमांक 94 मधील राखीव वनपरिक्षेत्रात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना जंगलात लाकडे तोडण्याचा आवाज आला. त्यामुळे वनरक्षकांनी पाहणी केली असता, तीन इसम कुऱ्हाडीने सागवान झाडे तोडताना दिसून आले.

हेही वाचा - देशी दारूच्या काॅर्टरची किंमत 55 वरून 200 रुपये; येथे सहज होते उपलब्ध

मात्र, वनकर्मचाऱ्यांची चाहूल लागताच वृक्षतोड करणाऱ्या तिनही व्यक्तींनी जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोघांना पकडले. तर एक जण पसार झाला. पकडलेल्या दोघांची नावे अरुण मापारी व मनोहर जाधव (रा. मांडोली, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला) अशी सांगितली. तर फरार झालेला सहकारी भास्कर शिंदे असल्याचे सांगितले. 

वनकर्मचाऱ्यांनी लाकडे तोडण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच गावातील पाच जणांना घटनास्थळी आणून मारहाण केली. मोबाईलमधील रेकॉर्डिंग नष्ट केली. या प्रकरणी वनरक्षक गोपाल बोबडे यांनी बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. यावरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
देवठाणा भाग दोन मध्ये काही वनरक्षक कर्तव्यावर असताना राखीव जंगलात अवैध वृक्षतोड करणाऱ्या काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून बार्शिकाटळी पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
-सिद्धार्थ वाघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मेडशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal tree cutting in Washim district