निरक्षर महिलेने केली दारूबंदीची किमया

देवेंद्र रामटेके
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आसोली (जि. गोंदिया) ः फुलचूर ग्रामपंचायतीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. अगदी गोंदिया शहराला लागून असल्याने येथे शहरी प्रभाव नेहमीच पहावयास मिळतो. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक लहानमोठे प्रशासकीय अधिकारी वास्तव्य करतात. जे मोठमोठ्या अधिकाऱ्यांना जमले नाही ती किमया एका निरक्षर महिलेने करून दाखविली. संपूर्ण गावात दारूबंदी करून गाव दारूमुक्‍त केले आहे. ही किमया करणाऱ्या महिलेचे नाव आहे कल्पना बुधराम कुंभरे.

आसोली (जि. गोंदिया) ः फुलचूर ग्रामपंचायतीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. अगदी गोंदिया शहराला लागून असल्याने येथे शहरी प्रभाव नेहमीच पहावयास मिळतो. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक लहानमोठे प्रशासकीय अधिकारी वास्तव्य करतात. जे मोठमोठ्या अधिकाऱ्यांना जमले नाही ती किमया एका निरक्षर महिलेने करून दाखविली. संपूर्ण गावात दारूबंदी करून गाव दारूमुक्‍त केले आहे. ही किमया करणाऱ्या महिलेचे नाव आहे कल्पना बुधराम कुंभरे.
फुलचूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास सात हजाराच्या घरात आहे. अगदी शहराला लागून या गावाची सीमा असल्यामुळे गावात अवैध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आपले बस्तान मांडले होते. अगदी गल्लीबोळात सट्टा, जुगार, अवैध दारूविक्री सर्रासपणे केली जात होती. प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी वारंवार नागरिकांनी केली होती. मात्र, प्रशासन काहीही कारवाई करत नसल्यामुळे अवैध व्यावसायिकांना कुणाचेही भय नव्हते. संपूर्ण गावात अवैध धंद्यांना उधाण आले होते. त्यामुळे गावाचे सामाजिक आरोग्या बिघडले होते. त्यातच अनेक कुटुंबात दररोज भांडण होत होती. दारू व जुगाराच्या व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली होती. एवढेच नव्हे तर या अवैध दारूविक्रीमुळे गावातील अल्पवयीन मुलेदेखील व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
गावात चालणाऱ्या अवैध व्यवसाय व दारूविक्रीबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यात यश आले नाही. यावेळी गावातील सर्वच महिलांची एक सभा घेऊन त्यात संपूर्ण गाव दारूबंदीची घोषणा करण्यात आली. गावात मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळी असल्यामुळे सुरवातीला दारूबंदीकरिता महिलांना मोठी कसरत करावी लागली. यासाठी कुंभरे यांच्या मार्गदर्शनात महिलांनी गावकऱ्यांची अनेकदा सभा घेतल्या. महिलांनी दारूबंदी समिती तयार केली. समितीच्या अध्यक्ष म्हणून निरक्षर असलेल्या मात्र, दारूबंदीसाठी झपाटलेल्या कल्पना कुंभरे यांची नियुक्‍ती करण्यात आली. या चळवळीत रानी बैस, उर्मिला नागपुरे, रीता बैस, रंजू जोशी, इंदू राऊत, सरिता बावणे, रेखा नागपुरे, योगी हिरापूरे, रंजू मस्करे आदींनी सहभाग घेतला. प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. दरम्यानच्या काळात गावात दारूबंदी व्हावी म्हणून रात्रभर जागून दारू आणणाऱ्यांवर पाळत ठेवली. अनेकदा दारू विक्रेत्यांची दारू पकडून फोडली किंवा पोलिसांच्या स्वाधीन केली.
गावात दारूसह सर्व अवैध धंदे बंद करण्याचा चंग महिलांनी केला होता. त्यात प्रशासनाची भूमिका मात्र, बघ्याची ठरली होती. तरीही अध्यक्ष व महिलांनी आपली मागणी लावून धरली व गावात दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी अवैध दारूविक्री करणऱ्यांना गावात दारू आणन्यापासून व विकण्यापासून थांबविले. कालांतराने गावात दारू व्यवसाय कायमचा बंद करावा लागला.

गावात दारूबंदी करताना अनेक अडचणी आल्या. परंतु गावातील संपूर्ण महिलांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही दारूबंदी करू शकलो. आता गावाला जुगार व मटकामुक्‍त करण्याचा ध्यास आहे.
- कल्पना कुंभरे,
अध्यक्ष दारूबंदी समिती फुलचूर

Web Title: illiterate women faught for liquor free villege