पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी

युसूफ पठाण
युसूफ पठाण

पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी
नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास संघात "कमबॅक' करू शकतो, अशा शब्दांत भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसूफ पठाणने भावना व्यक्‍त केल्या आणि, पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्‍त केली.
विदर्भ आणि बडोदा यांच्यात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर मंगळवारपासून सुरू होत असलेल्या रणजी करंडक सामन्यासाठी नागपुरात आलेल्या युसूफने "सकाळ'शी बोलताना घरगुती क्रिकेट आणि पुनरागमनाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. युसूफ म्हणाला, सध्या भारतीय संघात असलेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेता "कमबॅक' करणे सहजशक्‍य नाही. मात्र, रणजी व अन्य स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यास कठीणही नाही. भारतीय संघाकडून खेळण्याला खूप वर्षे झालीत. पुन्हा निळी जर्सी घालण्याची इच्छा आहे. मलाच नव्हे, माझे चाहते आणि कुटुंबीयांनाही मला भारतीय संघाकडून खेळताना पाहायचे आहे. सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नक्‍कीच संधी मिळू शकते.
36 वर्षीय युसूफने यंदाच्या मोसमातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्‍त केले. विजय हजारे करंडकात धावा काढल्यानंतर रणजी करंडकातील दोन सामन्यांतही फॉर्म कायम ठेवत दोन अर्धशतके नोंदविली. माझ्या योगदानामुळे अर्थातच संघाचाही खूप फायदा होत आहे. उर्वरित सामन्यांतही फॉर्म कायम ठेवण्यावर भर राहणार असल्याचे त्याने सांगितले. वरिष्ठ खेळाडू या नात्याने युसूफकडून बडोदा संघाला खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करतानाच तो युवा खेळाडूंनाही "मोटिव्हेट' करीत आहे. युसूफचा भाऊ इरफान देशाअंतर्गत स्पर्धेत यंदा जम्मू काश्‍मीरकडून खेळत आहे. त्याची गैरहजेरी जाणवत असल्याचे युसूफने सांगितले. इरफानसोबत "ड्रेसिंग रूम' शेअर करणे निश्‍चितच वेगळा आनंद देणारा आहे. त्याची अनुपस्थिती जाणवत असली तरी दोघेही जवळपास दररोजच फोनवरून एकमेकांच्या संपर्कात असतो.
आयपीएल चढउताराबद्दल विचारले असता युसूफ म्हणाला, स्पर्धेतील माझी कामगिरी अजिबात निराशाजनक नाही. टी-20 सामन्यांमध्ये मला पुरेशी संधीच मिळत नाही. शेवटची काही षटके शिल्लक असताना सहाव्या किंवा सातव्या स्थानावर फलंदाजीस गेल्यानंतर माझ्याकडून 50 किंवा 100 धावांची अपेक्षा करणे चुकीचे आहे. अशावेळी वेगवान 30-40 धावाही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आयपीएलमध्ये माझी नेमकी हीच भूमिका असते. त्यामुळे फ्रेंचाईसीही माझ्यावर खुश आहेत.
ऑस्ट्रेलियात विराटसेना चमकेल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या संभाव्य कामगिरीबद्दल युसूफ म्हणाला, सामन्यांना अद्याप सुरुवात झाली नसल्याने कामगिरीबद्दल आत्ताच सांगता येणार नाही. विदेशी संघांसाठी तेथील खेळपट्ट्या नेहमीच आव्हान राहिले आहे. तथापि, विराटच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत केलेले शानदार प्रदर्शन लक्षात घेता, या दौऱ्यात भारतीय संघ नक्‍कीच चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे. एक भारतीय म्हणून संघाने तिन्ही फॉर्मटमध्ये चांगले प्रदर्शन करावे, अशी माझ्यासह तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा राहील.
युसूफ बोल...
- आयपीलमधील कामगिरी अजिबात निराशजनक नाही
- आयपीएलमध्ये सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस गेल्यानंतर 50 किंवा 100 धावांची अपेक्षा चुकीची.
- बडोदा संघाकडून खेळताना इरफानची अनुपस्थिती जाणवते.
- बडोदा संघातील युवा खेळाडूंना मोटीव्हेट करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com