प्रतिरूप विधानसभा आजपासून - ॲड. चटप

प्रतिरूप विधानसभा आजपासून - ॲड. चटप

नागपूर - विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगळ्या विदर्भासाठी दुसरी प्रतिरूप विधानसभा सोमवारपासून (ता. ३) दोन दिवस डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडत आहे. यासाठी सत्तापक्ष व विरोधी पक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच मंत्रिमंडळही तयार केल्याची माहिती विदर्भ राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले ॲड. वामनराव चटप यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिरूप विधानसभा चालविण्यासाठी सत्तापक्षात ४०, तर विरोधी पक्षात २२ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय सत्तेतील १४ आमदारांना कॅबिनेट आणि १३ आमदारांना राज्यमंत्रिपद दिले आहे. महाधिवक्ता, निवडणूक आयुक्त, वित्त आयोग, ओबीसी, एसबीसी, अनुसूचित जाती, जमाती, महिला आयोग, प्रशासकीय सेवा आयोगावरही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल म्हणून डॉ. मधुकरराव निसळ, विधानसभा अध्यक्षपदी ॲड. मोरेश्‍वरराव टेंभूर्णे, उपाध्यक्षपदी मधुभाऊ कुकडे तर विरोधी पक्षनेता म्हणून राम नेवले यांची निवड केल्याचे प्रतिरूप विधानसभा आजपासून ॲड. चटप यांनी सांगितले.

उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या कामकाजात राज्यपाल सकाळी आमदार, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, कॅबिनेट, राज्यमंत्र्यांचा शपथविधी करतील. यानंतर उरी येथील शहीद आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहतील. नंतर वित्तमंत्री डॉ. श्रीनिवास खांदेवाले अर्थसंकल्प मांडतील. राज्यपालांचे अभिभाषणानंतर लक्षवेधी, शासकीय प्रस्ताव, अर्धा तास चर्चा होऊन कामकाज संपेल. दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा, स्थगन प्रस्ताव, प्रश्‍नोत्तरे, अशासकीय ठराव आणि अंतिम आठवडा प्रस्ताव ठेवण्यात येईल. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात विदर्भातील विविध विषयांवर चर्चा केल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


चहापाण्यावर बहिष्कार नाही - राम नेवले
आतापर्यंत राज्याच्या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त करून चहापानावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे चित्र दिसते. मात्र, प्रतिरूप विधानसभेत विरोधी पक्षाने चहापाण्यावर बहिष्कार टाकण्याचे टाळल्याचे विरोधी पक्षनेते राम नेवले यांनी स्पष्ट केले.

ॲड. अणे आणि आमच्यात मतभिन्नता - ॲड. चटप

नागपूर : वेगळ्या विदर्भासाठी ॲड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी स्थापन करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढविण्याचे जाहीर केले. मात्र, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मते, आतापर्यंत विदर्भ राज्य मिळविण्यासाठी केलेले सर्वच राजकीय प्रयत्न फसले आहेत. त्यामुळे ॲड. अणे आणि आमच्यात मतभिन्नता असून, एकत्र येऊन आंदोलन करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे समितीचे निमंत्रक ॲड. वामनराव चटप यांनी स्पष्ट केले. 


ॲड. चटप म्हणाले, वेगळे राज्य करण्यासाठी घटनात्मक तरतूद आहे. केंद्राद्वारे नव्या राज्याची घोषणा होते. राज्याला त्याचा अधिकार नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सहभागी होऊन वेगळा विदर्भ होणे कधीही शक्‍य नाही. आतापर्यंत बरेचदा असे प्रयत्न करण्यात आलेत, ते सर्व फसले. त्यामुळे ॲड. अणेंच्या या मुद्यावर समितीचे मत वेगळे आहे. याशिवाय अणेंच्या मते वेगळ्या विदर्भासाठी जनमत आणि केळकर आयोगाद्वारे केलेल्या शिफारसी लागू करण्यावर केलेला उशीर या दोन मुद्यावर समिती विरोधात आहे. विदर्भासाठी वेगवेगळ्या संघटना लढा देत आहेत. त्या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या आंदोलनात येतात. त्याचा विरोध नाही.  केवळ मताला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात वेगवेगळ्या संघटना असल्या तरी, त्यांचा उद्देश वेगळा विदर्भ मिळविणे हाच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

३१ डिसेंबरपर्यंतची मुदत 
नागपूर - वेगळ्या विदर्भासाठी तेलंगणासारखे हिंसक आंदोलन होत नसल्याचे बोलले जाते. मात्र, वेगळ्या विदर्भासाठी राज्य आणि केंद्र शासनाला ३१ डिसेंबरपर्यंतची वेळ देत असून, त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण देणार असल्याचा गर्भित इशारा विदर्भ राज्य आंदोलन  समितीचे निमंत्रक ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

ॲड. चटप म्हणाले, विदर्भाच्या आंदोलनाची सुरुवात पाच डिसेंबरपासून करण्यात येईल. प्रथम पाच दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडी विदर्भाच्या पाच टोकावरून निघतील. यात प्रामुख्याने तेलंगणाची सीमा असलेले कालेश्‍वर, छत्तीसगडची सीमा देवरी, सिंदखेडराजा, शेडगाव आणि उमरखेडचा समावेश आहे. या वेळी नागपुरात पाचही दिंड्या एकत्र आल्यावर विदर्भाच्या विरोधात असलेल्यांना विदर्भ सोडा ‘क्वीट इंडिया’ असा इशारा देण्यात येईल. 

शिवाय ‘सत्ताधाऱ्यांनो देता की जाता’ असे ठणकावून सांगण्यात येईल. यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारलाही वेगळ्या विदर्भ करण्याची मुदत देण्यात येईल. त्यानंतर १ जानेवारीला केंद्र सरकारविरुद्ध ‘देता की जाता, जनतेच्या लाथा खाता’ असा इशारा देण्यात येणार आहे. मात्र, यानंतर आंदोलनाची दिशा बदलवून ते अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. या वेळी प्रबीरकुमार चक्रवर्ती, राम नेवले व पदाधिकारी उपस्थित होते. 

फक्त मतभेद, मनभेद नाही - ॲड. अणे 
विदर्भ राज्य आंदोलन समिती व ‘विरा’मध्ये विदर्भाच्या मुद्द्यावरून मतभेद आहेत. विदर्भाचा मुद्दा निवडणुकीच्या माध्यमातून सुटू शकतो, असा विश्‍वास असल्याचे ‘विरा’चे संस्थापक ॲड. श्रीहरी अणे यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले. चटप आणि माझ्यात मतभेद असले तरी वैयक्तिक द्वेष नाही. मतभेद असलेल्या मुद्द्यांवर तडजोड होऊ शकते. मी उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रतिरूप विधानसभेत उपस्थित राहणार आहे, असेही ॲड. अणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com