चॉकलेटच्या गणपतीचे दुधात विसर्जन

दर्यापूर : चॉकलेटची गणेशमूर्ती.
दर्यापूर : चॉकलेटची गणेशमूर्ती.

दर्यापूर (जि. अमरावती) : गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी मातीच्या किंवा प्लॅस्टरच्या गणेश मूर्तीची स्थापना करीत सामान्य जण आराधना करतात; मात्र दर्यापुरातील नम्रता शहा यांनी आगळी वेगळी चॉकलेटची गणेशमूर्ती बनवून गणेशोत्सव काळात स्थापित केली. काचेच्या आवरणात या गणेशाला ठेवून किड्या मुंग्यांपासून संरक्षित करीत मनोभावे आराधना केली. या चॉकलेटच्या गणरायाचे सोमवारी दुधात विसर्जन केले. त्यापासून मिल्क शेक बनविण्यात आला, हे मिल्क शेक दर्यापुरातील अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात आले.
दर्यापुरातील बनोसा भागात वास्तव्य करणाऱ्या नम्रता शहा या उत्तम गृहिणी असून गृहउद्योग करीत नवनवे पदार्थ करून विक्री करतात. त्यांचे अनेक पदार्थ दूरदर्शन वाहिनीवरसुद्धा प्रदर्शित झाले आहेत. महिलांचे संघटन तनिष्काच्या त्या दर्यापुरातील संघटिका आहेत. गणेशोत्सव काळात नावीन्यपूर्ण काहीतरी बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यातून चॉकलेटचा गणपती बनविण्याची युक्ती सुचली. गोड पदार्थ असल्याने त्याचे योग्य संगोपन करण्याची काळजी घेतली. बुरशी व किड्या मुंग्यांपासून सुद्धा वाचवायचे असल्याने गणेशासोबत काचेचा बॉक्‍स बनविला. यात श्रद्धा पूर्वक स्थापना करून चॉकलेटच्या गणपतीला दहा दिवस ठेवले. या नावीन्य पूर्ण गणपतीला बघण्याकरिता त्यांच्या घरी अनेकांनी भेट दिली. नम्रता शहा यांनी या गणेशाचे दुधात विसर्जन करण्याचे ठरविले. जवळपास दीड किलो चॉकलेट या गणेशाच्या निर्मितीला लागले. सोबत ड्रायफ्रुट व नक्षीकाम करण्यात आले होते. श्रद्धापूर्वक दुधात विसर्जित केलेल्या गणेशाचे प्रसाद म्हणून वितरण करण्यात आले. घरच्या सदस्यांसह अनाथाश्रमातील मुलांना हा मिल्कशेक देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com