हंसराज अहिरांना निष्क्रियता भोवली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय समीकरण अनुकूल ठरले. त्यामुळे कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय समीकरण अनुकूल ठरले. त्यामुळे कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर तिकीट मिळविण्यासाठी धानोरकांना प्रचंड संघर्ष करावा लागला. या संघर्षात ते चर्चेत राहिले आणि लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले. मात्र, कॉंग्रेसच्या तिकीट वाटपातील गोंधळाचा लाभ भाजपला उचलता आला नाही. उलट कॉंग्रेसने आधी दोन उमदेवार घोषित केले. मात्र, शेवटच्या क्षणी धानोरकांची उमेदवारी घोषित झाली. धानोरकर काट्याची टक्कर देऊ शकतात, अशी चर्चा भाजपचे कार्यकर्ते करायला लागले. त्यामुळे कॉंग्रेसची संघटनात्मक बांधणी कमकुवत असताना धानोरकरांबाबत वलय निर्माण झाले. त्यातच धानोरकरांच्या उमदेवारीसाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे राष्ट्रवादी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभी राहिली. धानोरकरांनी शिवसेनेचा राजीनामा दिला. त्यामुळे सेनेचे बहुतांश कार्यकर्ते उघडपणे धानोरकरांच्या बाजूने फिरताना दिसले. भाजपचे उमदेवार हंसराज अहीर यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा धानोरकरांनी प्रभावीपणे लावून धरला. अहीर केंद्रीय गृहराज्यमंत्री होते. मात्र, त्यांचे मंत्रिपदही त्यांच्याविषयी नाराजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यांच्या मंत्रिपदाचा आणि जनतेच्या समस्यांचा तसा फारसा संबंध येत नाही. त्यामुळे मंत्री असतानाही जिल्ह्यात भरीव कामगिरी ते करू शकले नाही. याचीही नाराजी मतदारांमध्ये होती. त्यामुळे मागील पंचवीस वर्षांपासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या चंद्रपूर आणि बल्लारपूर मतदारसंघातही कॉंग्रेसने मोठे मताधिक्‍य मिळविले. धानोरकर यांना त्यांच्या जातीची एकगठ्ठा मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवारांनी राज्यभरात कॉंग्रेसच्या उमेदवारांना तडाखा दिला. एक लाखाच्या घरात वंचितचे उमदेवार ऍड. राजेंद्र महाडोळे यांनी मते घेतली. त्यातील दलित आणि माळी समाजाच्या मतांचा समावेश आहे. माळी समाज या जिल्ह्यात भाजपचा समर्थक राहिला आहे. परंतु, यावेळी ते वंचितकडे वळले. त्यामुळे अहिरांना फटका बसला. प्रत्येक निवडणुकीत जवळपास पन्नास हजार मतांचा टप्पा गाठणाऱ्या बसपने यावेळी अकरा हजारांचा पल्ला गाठला. ही मते कॉंग्रेसकडे वळली. या निवडणुकीत दारूबंदीचाही मुद्दा आला. दारूविक्रीवरून धानोरकरांना लक्ष्य केले गेले. परंतु, त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे दारूबंदी असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसला मताधिक्‍य मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inacativness defeated hansraj ahir