दुर्गम भागातील शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात

file photo
file photo

गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत काही शिक्षक न्यायालयात गेल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला असून बदलीपात्र शिक्षक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख संघटनांची समन्वय समिती निर्माण करण्यात आली असून याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पाडलेली असून फक्त गडचिरोली जिल्हा परिषदेने बदली प्रक्रिया रखडलेली आहे. मागील वर्षाच्या मे 2018 च्या बदली प्रक्रियेत काही शिक्षक विस्थापित झाल्याने त्यांना दुर्गम भागात जावे लागले. त्यामुळे 68 शिक्षक न्यायालयात गेले. महत्त्वाचे म्हणजे या 68 पैकी अनेक शिक्षकांनी यावर्षीच्या बदली प्रक्रियेत संवर्ग 1, 2 मध्ये फॉर्म भरलेला आहे. शासनाने पण या विस्थापित शिक्षकांना 28 मे 2018 च्या शुद्धीपत्रकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावर समुपदेशन करून त्यांना शाळा निवडण्याची संधी दिलेली आहे. परंतु यावरही विस्थापित शिक्षकांचे समाधान न झाल्याने हे शिक्षक न्यायालयात गेलेले आहेत. यंदा मे 2019 च्या बदली प्रक्रियेत फॉर्म भरूनही जिल्ह्यातील जवळपास 400 ते 500 दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षक बदलीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. बदल्यांमध्ये अन्याय झाल्याने शिक्षक ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा येत्या 26 जून ला उघडतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com