नागपूरचा टॉपटेन शहरात समावेश

प्रतापनगर ः दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील प्रतापनगर येथील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी उपस्थित संदीप जोशी, नंदा जिचकार व इतर पदाधिकारी.
प्रतापनगर ः दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील प्रतापनगर येथील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी उपस्थित संदीप जोशी, नंदा जिचकार व इतर पदाधिकारी.

नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा सर्वाधिक जलद गतीने विकसित होणाऱ्या जगातील टॉपटेन शहरांच्या यादीत युनायडेट नेशनने समावेश केला असल्याचे सांगितले. मुख्यमंत्रीच उमेदवार असलेल्या दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रतापनगर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. सर्वप्रथम तुमच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री होऊ शकलो असे सांगून त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. कामाच्या व्यापामुळे जास्त वेळ देऊ शकलो नाही याची खंतही व्यक्त केली. मंचावर बसलेले आणि समोर उपस्थित असलेले सर्वच देवेंद्र असल्याने मला पुन्हा प्रचाराला यायची गरज आहे का अशी विचारणा करून त्यांनी पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहनसुद्धा केले. नागपूर शहरात सर्व जागितक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आल्या आहेत. मेट्रो रेल्वे धावू लागली आहे. रस्ते कॉंक्रिटेच झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. सर्वच नागरी सुविधा येथे निर्माण झाल्या आहेत. मिहानमध्ये मोठमोठे उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे. याची दखल युनायटेड नेशनने घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी संदीप जोशी, महापौर नंदा जिचकार, मुन्ना यादव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या कुठल्याही शेंबड्या पोराला कोणाचे सरकार येणार हे विचारले तरी तो महायुतीचे येणार असे सांगतो. पराभव अटळ असल्याने निवडणूक जाहीर झाली असताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी बॅंकॉकला निधून गेले होते. त्यांना आग्रह करून नेत्यांना बोलवावे लागले. ते कोणावर टीका करीत आहेत याचेही भान त्यांना राहिले नाही. त्यामुळे 42 आमदारांपैकी कॉंग्रेसचे 24 उमेदवारही निवडून येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कोणी टिकायला तयार नाही. त्यामुळे शरद पवार यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर बाकी मेरे पिछे आहो असा डॉयलॉगही त्यांनी आपल्या भाषणातून ऐकवला.भाजपच्या कार्यकाळात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच कुठल्याही वर्गावर अन्याय होणार नाही. खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्याने दरवर्षी आम्ही त्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. कोणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com