शंभर रुपयांमध्ये उत्पन्नाचा दाखला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये सेतू केंद्राचे काम बघणाऱ्याने अमरावती तहसील कार्यालयात येऊन शंभर रुपयांमध्ये उत्पन्नाचे दाखले विकले. तहसीलदारांच्या ही बाब निदर्शनास येताच, शुक्रवारी (ता. 18) त्याला पकडून शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये सेतू केंद्राचे काम बघणाऱ्याने अमरावती तहसील कार्यालयात येऊन शंभर रुपयांमध्ये उत्पन्नाचे दाखले विकले. तहसीलदारांच्या ही बाब निदर्शनास येताच, शुक्रवारी (ता. 18) त्याला पकडून शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 
कपिल किशोर कान्हेड (वय 28 रा. माळीपुरा, पुसद) हा ऑक्‍टोबरच्या पहिल्याच आठवड्यात अमरावतीत रुक्‍मिणीनगर येथे राहायला आला. उत्पन्नाच्या दाखल्यावर इंग्रजीत ओरिजनल असा शिक्का कधीच मारल्या जात नाही. परंतु कपिल याने शंभर रुपयांत विकलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर मात्र तसे आढळले. तहसील कार्यालयातून वितरित केल्या जाणारे बहुतांश दाखले हे डिजिटल झाल्याने सहा महिन्यांपासून उत्पन्नाच्या दाखल्यावर तहसीलदार यांची डिजिटल स्वाक्षरी असते. मात्र, तो गरजूंना गाठून उत्पन्नाचे दाखले विकत होता. नायब तहसीलदार यांच्याजवळ शुक्रवारी (ता. 18) एक व्यक्ती आला. त्याने त्यांना उत्पन्नाचा दाखला दाखविला. त्यावर एक तारीख दिली होती. परंतु त्या तारखेला तहसील कार्यालयामधून कुणालाच दाखला दिल्या गेला नसल्याची बाब निदर्शनास आली. शिवाय तहसील कार्यालयाच्या दाखल्यावर गोल शिक्‍क्‍याचा वापर केल्या जातो. शिवाय त्यावर इंग्रजीत ओरिजनल असे कधीच लिहिल्या जात नाही. त्यामुळे कपिलचा भंडाफोड झाला. कपिल कान्हेड याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यावर त्याच्याकडून काही दाखलेसुद्धा जप्त करण्यात आले. कपिल हा व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनिअर असल्याचे पोलिसांनी सांगितले. नायब तहसीलदार गोपाल गुलाबराव कडू (वय 46) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी कपीलविरुद्ध फसवणूक, विश्‍वासघातप्रकरणी गुन्हा दाखल करून शनिवारी (ता. 20) त्याला विशेष न्यायालयासमोर हजर केले. 

कपिल कान्हेड याने उत्पन्नाच्या दाखल्यावर मारलेले शिक्के नेमके कोठून आणले. किती जणांना असे दाखले दिले. या प्रकरणात त्याच्यासोबत अन्य काही जण सहभागी आहेत काय, याची चौकशी केल्या जाईल.
- शिवाजी बचाटे, पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income tax filing for one hundred rupees