कोळसा व्यापाऱ्यावर "आयकर'चा छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नागपूर - आयकर विभागाच्या पथकाने रामदासपेठ व्हीआयपी रोड येथील कोळसा व्यापारी राजेंद्र अग्रवाल यांच्या घरी छापा टाकला. हा छापा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घातला. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र अग्रवाल कोळसा व्यापारी असून त्यांचा अनेक ठिकाणी व्यवसाय आहे.

नागपूर - आयकर विभागाच्या पथकाने रामदासपेठ व्हीआयपी रोड येथील कोळसा व्यापारी राजेंद्र अग्रवाल यांच्या घरी छापा टाकला. हा छापा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घातला. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र अग्रवाल कोळसा व्यापारी असून त्यांचा अनेक ठिकाणी व्यवसाय आहे.

दरम्यान, आयकर विभागाने बेहिशेबी संपत्तीसंदर्भात व्यावसायिकांवर नजर रोखली आहे. आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास तीन वाहनांनी येऊन स्पंदन हॉस्पिटलजवळील अग्रवाल यांच्या बंगल्यात छापा घातला. चौकीदाराला दार उघडण्यास सांगितले. सोबत पोलिस पथक होते. यानंतर त्यांनी अग्रवाल यांना आतील दरवाजा उघडण्यास सांगितला असता त्यांनी आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट मोबाईलद्वारे आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींना याची माहिती दिली. ते लगेच बंगल्यासमोर येऊन धडकले. आयकर विभागाने त्यांच्या नातेवाइकांना दरवाजा उघडण्याच्या सूचना द्यावी, अशी विनंती केली असता त्यांच्या मित्रांनी वाद घातला. तोतया अधिकारी समजून जवळपास एक ते दीड तास त्यांना बाहेर रोखून धरले. दरम्यान, आयकरच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना अधिक पोलिस बळ बोलाविण्याच्या सूचना केल्यानंतर सीताबर्डी, धंतोली व अन्य ठिकाणचे पोलिस पथक, गस्तीपथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आयकर विभागाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता अग्रवाल यांच्या मित्रांनी त्यांना दार उघडण्याची विनंती केली. यानंतर अग्रवाल यांनी आतील दरवाजा उघडून पथकास बंगल्यात प्रवेश दिला. आयकर विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने बंगल्याची झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत बंगल्याची झाडाझडती सुरू होती. या कारवाईत नेमके काय हाती लागले, याचा मात्र तपशील मिळू शकला नाही.

Web Title: Income Tax raid on the coal merchant