आवक वाढली, शासकीय केंद्र ओव्हरफ्लो

file photo
file photo

अमरावती : यंदा खुल्या बाजाराच्या तुलनेत शासकीय खरेदी केंद्रांवर कापसाची खरेदी जोमात आहे. आवक वाढली असून जागा अपुरी पडत असल्याने पुढील सप्ताहात खरेदी बंद करण्याची वेळ पणन महासंघावर येण्याची शक्‍यता आहे. खराब हवामानामुळे गेल्या सप्ताहात काही केंद्रांवरील बंद पडलेली खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. खासगीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात  66 हजार 513 क्विंटल कापूस शासकीय केंद्रावर अधिक खरेदी झाला आहे.

शेतकऱ्यांनी खासगी बाजाराकडे धाव

यंदाचा असंतुलित पाऊस, अवकाळीचे आक्रमण व परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ याचा परिणाम कापसाच्या प्रतवारीसह उत्पादकतेवर झाला. त्यामुळे यंदाचा हंगाम जोमदार राहणार नाही, अशी शक्‍यता होती. खुल्या बाजारात कापसाची खरेदी शासकीय खरेदीच्या महिनाभर अगोदर सुरू झाली. आर्थिक निकडीपायी शेतकऱ्यांनी खासगी बाजाराकडे धाव घेतली. शासकीय केंद्र सुरू झाल्यानंतर मात्र हा ओघ थांबला व शासनाला यंदा बऱ्यापैकी कापूस संकलित करता आला. शनिवारपर्यंत ( ता.15) शासकीय केंद्रांवर दोन लाख 3 हजार 537 क्विंटल खरेदी झाली. त्या तुलनेत खासगी बाजारपेठेत 1 लाख 37 हजार 24 क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. शासनाकडे यंदा 66 हजार 513 क्विंटल कापूस अधिक आला.


 1 लाख 6 हजार 201 क्विंटल खरेदी 

जानेवारीत खासगी खरेदी जोमात होती. 15 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील अमरावती, धामणगावरेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगावसुर्जी, अचलपूर व धारणी या नऊ खासगी केंद्रांवर 1 लाख 6 हजार 201 क्विंटल खरेदी झाली होती. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांकडे मोर्चा वळविल्याने 15 फेब्रुवारीपर्यंत खासगी बाजारात 30 हजार 823 क्विंटलच कापूस आला.सीसीआयचे अभिकर्ता म्हणून राज्य कापूस महासंघाने खरेदी सुरू केली. त्यांनी जिल्ह्यात मोर्शी, वरुड, अंजनगावसुर्जी, अचलपूर, तर सीसीआयने अमरावती, नांदगाव खंडेश्‍वर, धामणगावरेल्वे, दर्यापूर या केंद्रांवर खरेदी केली.

जागा अपुरी, खरेदी थांबणार

अजूनही कापसाची आवक असल्याचे पणनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असून आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या कापसामुळे जागा अपुरी पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जागेअभावी खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. अमरावती, अंजनगावसुर्जी लेहगाव येथील केंद्र बंद होते. ते उद्यापासून सुरू होणार असले तरी जागेचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे पुढील आढवड्यात खरेदी बंद करण्याची वेळ येण्याची शक्‍यता येथील झोनल मॅनेजर श्री. कांबळे यांनी व्यक्त केली.

हंगामातील आतापर्यंतची खरेदी (क्विंटल)
पणन महासंघाचे केंद्र ः 92,436
सीसीआय ः 1,11,100
खासगी ः 1,37,024
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com