अपूर्ण विहीर लहान मुलांसाठी धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

वैरागड (जि. गडचिरोली) : आरमोरी तालुक्‍यातील कुरंडी ग्रामपंचायतअंतर्गत वडेगाव येथे ठक्करबाप्पा योजनेतून विहिरीचे बांधकाम कंत्राटदारांकडून करण्यात आले. परंतु काम पूर्ण करण्यात आले नाही. सभोवताल पाणी साचल्याने ही विहीर लहान मुलांसाठी धोकादायक ठरली असून काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वडेगाव येथे 2018-19 या वर्षासाठी ठक्करबाप्पा योजनेतून साडेसात लाख रुपये मंजूर करून विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु या विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. विहिरीचे बांधकाम पूर्ण करून विहिरीला तोंडी व प्लेटफार्म बांधणे आवश्‍यक होते. परंतु कंत्राटदाराने तसे न केल्याने विहिरीच्या सभोवताल पाणी साचून त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने आपली लहान मुले घरी ठेवून महिला, पुरुष शेतावर रोवणीसाठी जातात. अशावेळी पोहण्यासाठी किंवा खेळताना मुले तोल जाऊन विहिरीत पडू शकतात. त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका नाकारता येत नाही. या अर्धवट विहिरीमुळे एखाद्या बालकाला धोका निर्माण झाला किंवा दुर्घटना घडली, तेव्हा ग्रामपंचायतीला जाग येईल काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
ग्रामपंचायतीचे दुर्लक्षच
कुरंडी ग्रामपंचायतीअंतर्गत वडेगावसह इतर अनेक गावे येतात. पण, या ग्रामपंचायतीचे गावातील समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वडेगाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केल्यानंतरही या मागणीकडे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

कंत्राटदाराने पोकलेन मशीनचा वापर केल्यामुळे विहिरीभोवतीचा खड्डा मोठा झाला. आम्ही कंत्राटदाराचे बिल रोखले असून विहिरीचे काम पूर्ण होईपर्यंत त्याला बिल अदा करण्यात येणार नाही.
- टिकेश कुमरे,
सरपंच, ग्रामपंचायत, कुरंडी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incomplete wells dangerous for young children