'फास्टॅग' नाही 'फास्ट'! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

सरकारने फास्टॅगसाठी दिलेल्या 15 डिसेंबर या अंतिम तारखेला पुन्हा तीस दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. यामुळे ज्यांनी फास्टॅग काढले नाही त्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

नागपूर : "वन नेशन वन फास्टॅग' या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी योजनेला पुन्हा 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ही योजना आता नव्या वर्षातच लागू होणार आहे. देशव्यापी वाहतूकदार या योजनेत समाविष्ठ होताना येत असलेल्या अडचणी व स्थानिक वाहतूकदारात निरुत्साह असल्याने फास्टॅगला मुदतवाढ मिळाली आहे. 

सरकारने फास्टॅगसाठी दिलेल्या 15 डिसेंबर या अंतिम तारखेला पुन्हा तीस दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. यामुळे ज्यांनी फास्टॅग काढले नाही त्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यामुळे अर्ज करूनही लगेच फास्टॅग मिळत नसल्याचे मत काही वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. मुदतवाढ दिल्यानंतर "वन नेशन वन फास्टॅग' या योजनेअंतर्गत रोख रक्कम भरण्यासाठी टोल नाक्‍यावंर केवळ एकच रांग राखीव ठेवण्यात येणार होती. ही प्रणाली सध्या अंमलात आणली जात आहे. मात्र, वाहनांच्या रांगा वाढल्यास दुसरा मार्ग खुला करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे "फास्टॅग'साठी राखीव रांगेतून विना फास्टॅगची गाडी गेल्यास त्याच्याकडून दुहेरी टोल वसूल केला जात आहे. 

Image may contain: sky and outdoor

एसटी बसेसचाही वांदा

एसटीच्या सर्वच आगाराच्या बसेसला फास्टॅग लावण्यात आले आहे. मात्र, आगाराकडून फास्टॅगसाठी काढलेल्या खात्यात रक्कम ठेवत नसल्याने ही योजना अपयशी ठरत असल्याचे सांगण्यात आले. टोल नाका व्यवस्थापक पोटे म्हणाले, चंद्रपूर, वर्धा व हिंगणघाट आगाराकडून फास्टॅग खात्यात रक्कम वळती केली जाते. त्यामुळे त्यांच्या गाड्यावर लावलेले फास्टॅग काम करते. मात्र, नागपूर आगार खात्यात पैसे ठेवत नसल्याने तेथील गाड्यांवरील फास्टॅग काम करीत नाही. त्यांच्याकडून रोख घ्यावी लागते. या मार्गावर नागपूरच्या सर्वाधिक गाड्या प्रवास करतात. 

एक रांग रोख रकमेसाठी 
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने फास्टॅगला तीस दिवसांची मुदतवाढ दिल्याचे पत्र मिळाले आहे. आमच्या टोल प्लाझावर सुमार 50 टक्के फास्टॅग झाले आहे. आता पंधरा जानेवारीनंतर एनएचएआय कोणती भूमिका घेणार याबद्दल माहिती नाही. टोल नाक्‍यावरील रांगेतील 75 टक्के वाहनधारकांकडून फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल वसूल केला जावा. 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गाड्यांकडून टोल रक्कमेत स्वीकारू नये, असे परिवहन मंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात नमूद आहे. आम्ही सध्या एक रांग रोख रकमेसाठी ठेवली आहे. गाड्या वाढल्यास आणखी रांगा खुल्या करता येतील. 
- विनेश पोटे, 
व्यवस्थापक, बोरखेडी टोल प्लाझा

हेही वाचा - शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यापुढे सोबतच : उद्धव ठाकरे

स्थानिक वाहतूकदार निरुत्साही

स्थानिक वाहतूकदार योजनेप्रती उदासीन असल्याची माहिती टोल प्लाझा संचालकांनी दिली. टोल नाका परिसरातील गावांना टोलमध्ये सूट दिली आहे. त्यामुळे देखील अडचण निर्माण झाली आहे. मात्र, त्यांना इतर ठिकाणी टोल द्यावा लागेल किंवा फास्टॅग प्रणालीचा अवलंब करावा लागेल. मात्र, स्थानिक वाहतूकदार इतरत्र व लांबचा प्रवास करीत नसल्याने ते या योजनेबाबत फारसे उत्सुक नाहीत. 

विनाकारण गुंतवणूक का करावी 
मी माझी गाडी घेऊन फक्त शहरात फिरतो. वर्षांतून तीन किंवा चारवेळा कारने किंवा माझ्या वाहनाने बाहेर जाण्याची वेळ येते. टोल प्लॉझावर एक रांग विना फास्टॅग वाहनांसाठी आहेच. मला जर शहरातच प्रवास करायचा असेल तर फास्टॅगची गरज काय? मी विनाकारण पाचशे रुपयांची गुंतवणूक का करावी. 
- रामेश्‍वर गजभे

अधिक वाचा -  ठाकरे सरकार नव्हे, हे तर "स्थगिती सरकार', देवेंद्र फडणवीसांनी उडविली खिल्ली

तीन चाकीसाठी नियम नाहीत

फास्टॅगसाठी आखलेल्या नियमावलीत तीन चाकी प्रवासी वाहतूकदाराचा समावेश नसल्याने ते देखील फास्टॅग काढू शकले नाहीत. आटोचालक रमेश सातपुते म्हणाले, माझा आटो शहराबाहेर जात नाही. फारसे आटोचालक नाका ओलांडत नाहीत. त्यामुळे त्यांना फास्टॅग काढायची गरज नाही. तसाही तीन चाकी वाहनांचा समावेश त्यात नसल्याचे सांगण्यात येते, आम्हाला त्याची कल्पना नाही. तीन चाकीमाल वाहतूक गाड्यांविषयी त्यांना काही माहिती नव्हती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase the duration to fastag