मौदा तालुक्‍यात चोरींच्या घटनांत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

रोकड व दागिने लंपास केल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. मजुरांची रोजी कशी तोडावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मौदा, (जि. नागपूर) :  मौदा तालुक्‍यातील वेगवेगळ्या ठिकाणी 24 तासांत चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील काही महिन्यांत चोरींच्या घटनात वाढ झाली असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील आसोली गावातील रामकृष्ण देवराव घाटोळे (वय 43) हे रविवारी रात्री जेवणानंतर झोपले. सोमवारी सकाळी ते उठले. त्यावेळी त्यांना घरातील कपाट उघडे दिसले. त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने (किंमत 32 हजार 500) व 17 हजार 500 रुपये रोख दिसली नाही. याविषयी त्यांनी विचारणा केली असता, कुणालाच काही ठाऊक नसल्याने त्यांनी मौदा पोलिसांत चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. 

दुसरी घटना तारसा येथे दुपारी

दुसरी घटना तारसा येथे दुपारी अकराला घडली. तारसा येथील नारायण कुलरकर (वय 45) हे पत्नीसह सोमवारी सकाळी शेतात गेले होते. दुपारी दोनदरम्यान ते घरी परत आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांच्या कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने (किंमत 43 हजार 500) व रोख 20 हजार असा एकूण 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. याची त्यांनी मौदा पोलिसांत तक्रार केली आहे. या दोन्ही चोरीच्या घटनांचा क्रम सारखाच असल्याने चोरटे एकच असावेत, असाही अंदाज लावला जात आहे. मौदा पोलिस दोन्ही घटनांचा तपास करीत आहे. 

शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट

विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीच्या भरवशावर चालतो. यामुळे त्यांच्या घरी मजुरांना देण्यासाठी रोख ठेवलेली असते. चोरट्यांनी त्यांची रोकड व दागिने लंपास केल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. मजुरांची रोजी कशी तोडावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे या प्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in theft cases in Mauda taluka