सर्वच स्तरावर खर्च वाढावा

सर्वच स्तरावर खर्च वाढावा

नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड

जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे. त्याचवेळी देशात पाच कोटी तर जगात जवळपास साडेचार कोटी मनुष्यबळाची आवश्‍यकता निर्माण होईल. रोजगाराच्या या सर्व संधीचा लाभ घेण्यासाठी कौशल्य शिक्षण घेतलेल्या युवकांची गरज भासणार आहे. भारतातील उद्योग क्षेत्र बऱ्यापैकी विस्तारत आहे. या विकासात हातभार लावण्याचे काम शिक्षणक्षेत्राकडून होत आहे. परंतु, एवढ्या महत्त्वाच्या क्षेत्रावर जीडीपीच्या किमान सहा टक्के निधी खर्च अपेक्षित असताना तो सध्या अर्ध्यावर आहे. 

गेल्या काही वर्षांत नागपूरचा एक शैक्षणिक हब म्हणून उदय होत आहे. शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची ओळख असताना नितीन गडकरी आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी नागपुरात एम्स, ट्रिपल आयटी, आयआयएम आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची पायाभरणी झाली. यामुळे या शहराकडे आकर्षण वाढले आहे. मात्र, जागतिक दर्जाच्या संस्था आल्या असताना, त्यांची भविष्यातील वाटचाल नेमकी कशी असावी याकडे बघताना, कौशल्यविकास, रोजगाराची संधी, स्किलबेस एज्युकेशन, सोयीसुविधांची उपलब्धता आणि अभ्यासक्रमांमध्ये आवश्‍यक असलेले आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. 

शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी स्थानिक सस्थांनाही स्पर्धेत टिकण्यासाठी बदलाच्या वाटेने जावे लागेल. एवढेच नव्हे तर अध्यापनाच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल करावा लागेल. विद्यार्थ्यांनाही तो बदल आत्मसात करण्यासाठी आवश्‍यक त्या सोयीसुविधांची उपलब्धता तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. शैक्षणिक संस्थांसोबतच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्येही बदल अपेक्षित असून नवनव्या संशोधनातून शैक्षणिक आणि सामाजिक बदलांकडेही लक्ष देण्याची तेवढीच गरज आहे. युवकांना आपल्या आवडी व निवडीनुसार शैक्षणिक क्षेत्र निवडून स्वत:चे कौशल्य सतत वाढविणे आवश्‍यक आहे. संबंधित क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. सुंदर रस्ते, प्रवासाच्या सोयी, इतर भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत. म्हणून इंजिनिअर आणि मेडिकल या वाटेने न जाता रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणाऱ्या सुवर्ण वाटा चोखाळून स्वत:ला कौशल्यपूर्ण करणे योग्य ठरेल. 

तज्ज्ञांच्या मते 
‘स्किल बेस’ शिक्षणावर हवा भर
मोठ्या संस्थांचाही विकास आराखडा 
निर्णयप्रक्रियेत लोकसहभाग 
उद्योगपूरक अभ्यासक्रम
 

जिल्हावार दृष्टिक्षेप

अमरावती
शिक्षकांचे समायोजन, अतिरिक्त शिक्षक, शिकस्त वर्गखोल्या
शिक्षकांच्या बदल्यांचे रोस्टर तयार नाही 
मेळघाटात बारा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांचे बदलीसाठी आंदोलन
शिक्षक मेळघाटमध्ये जाण्यास तयार नाहीत

यवतमाळ
जिल्हा परिषदेच्या दीडशे शाळांना दुरुस्तीची प्रतीक्षा
विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी नाही 

चंद्रपूर
‘मिशन नवचेतना’ हा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद
विषय शिक्षकांचे गट, या शिक्षकांचे प्रत्येक महिन्यात प्रशिक्षण
जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यावर भर

गडचिरोली
मोठ्या प्रमाणात रिक्त पदे
दहावी, बारावीत कॉपीचा महापूर 
दुर्गम भागातील आश्रमशाळा आठ दिवस बंद
शिक्षण मुख्यालयी राहत नाहीत

भंडारा
जुन्या शासकीय शाळा ओस
नगर परिषदेच्या अनेक शाळा बंद 
दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची ४० किलोमीटरची पायपीट

गोंदिया
३०२ शाळा डिजिटल 
लोकसहभागातून३२५ शाळांत वाचनकट्टे
७३६ शाळा इमारती जीर्ण, ५७ ठिकाणी हातपंप नादुरुस्त

वर्धा
मुख्याध्यापक, शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे
पुरेशा बसफेऱ्या नाहीत
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्‍न
दहावी, बारावीनंतर शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय

शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश 
(विद्यार्थीनिहाय आकडेवारी)

ऑस्ट्रिया - ११ हजार ६९३ डॉलर
डेन्मार्क - ११ हजार ४०३ डॉलर
बेल्जियम - १० हजार १२३ डॉलर 
नेदरलॅण्ड - १० हजार ७५ डॉलर
स्वीडन - १० हजार ४४ डॉलर
इंग्लंड - ९ हजार ९८० डॉलर 

भारत - फक्‍त ६०० डॉलर

तज्ज्ञ म्हणतात

विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी ‘स्किल बेस’ एज्युकेशनवर भर देण्याची आवश्‍यकता आहे.याशिवाय अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.  विशेषत: महाविद्यालयांना स्पर्धेत टिकण्यासाठी बरेच बदल करावे  लागतील. 
- डॉ. बबनराव तायवाडे, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज
 

शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आराखड्यावर कुणीही बोलताना दिसत नाही. हा आराखडा तयार करताना, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा समावेश करण्याची गरज आहे. त्यातूनच नव्या समाजाची निर्मिती  करण्याचे स्वप्न बघता येईल. शिक्षणाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. 
- डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलपती, कृष्णा अभिमत विद्यापीठ

लोकसहभागातून शिक्षणाचा विकास अपेक्षित  आहे. त्यासाठी सर्वप्रथम लोकसहभागातून संस्था आणि महाविद्यालयांचा विकास करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. उद्योगावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती करावी लागणार आहे.  सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील हे अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे.
-डॉ. केशव भांडारकर, माजी सिनेट सदस्य

सुदैवाने ‘मिहान’ प्रकल्पात  कधी नव्हे ते नव्या कंपन्या येत असल्याने रोजगाराच्या संधी भविष्यकाळात वाढणार आहेत.  यासाठी अधिकाधिक सोयी-सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना ‘स्किल बेस’ अभ्यासक्रम द्यावा लागेल. 
- डॉ. प्रमोद येवले 
प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

शिक्षणातून बौद्धिक विकासाला चालना देण्याचे काम केल्या जाते. प्रत्यक्षात त्यातून अर्थार्जनाची सोय करण्याचा दृष्टिकोन ठेवूनच ते पूर्ण करण्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा भर असतो. मात्र, शिक्षणातून संस्कार आणि नैतिक मूल्यांची शिकवण देण्याची गरज आहे. शिक्षक त्यात कमी पडताना दिसून येतो. 
- गोपाल बोहरे, शिक्षण सभापती, महापालिका 

मोठमोठ्या संस्था आल्याने प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. यासाठी अशा संस्थांची परिणामकारकता तपासणाऱ्या यंत्रणेची गरज आहे. मात्र, या संस्थांच्या आगमनामुळे संधी निश्‍चित आहे. त्यासाठी स्थानिक संस्था आणि त्यांच्यात ताळमेळासाठी सरकारने प्रयत्न करावा. 
-डॉ. अनिल ढगे, 
सचिव, नागपूर विद्यापीठ शिक्षक संघ

केवळ व्हीएनआयटी नव्हे तर त्याद्वारे शहरातील इतर संस्थांमध्ये कौशल्य विकास आणि इतर नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी पुढाकार घेतला जात आहे. यातून रोजगार आणि सोयी-सुविधांच्या दृष्टीने बरीच मदत होणार आहे. इतर संस्थांमध्येही नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्याच्यादृष्टीने कामास सुरुवात झाल्याचे दिसते. - -विश्राम जामदार, अध्यक्ष, व्हीएनआयटी गर्व्हनिंग कौन्सिल

शिक्षणाचा विकास करण्यासाठी नेमका तो कसा करावा याबद्दल कालबद्ध आराखडा तयार करण्याची गरज आहे. लोकसहभागातून शिक्षणाचा विकास होणे अपेक्षित आहे. उद्योगांवर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती करावी लागणार आहे. त्‍यासाठी सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे. 
- ॲड. अभिजित वंजारी, सचिव, अमर सेवा मंडळ  

कौशल्याभिमुख अभ्यासक्रमावर भर देण्याची आवश्‍यकता आहे. उद्योगानुरूप शिक्षणासोबतच रोजगाराची निर्मिती होणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमांमध्ये  आमूलाग्र बदलाची गरज आहे. महाविद्यालयांना या संस्थांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बरेच बदल करावे लागणार आहे. यासाठी शासनाकडून महाविद्यालयांना सोयी-सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुरेसा निधी देण्याची गरज आहे. पारंपरिक अभ्यासाक्रमांमध्येही आमूलाग्र बदल करावा लागेल.  
- डॉ. राहुल खराबे, सहाय्यक अधिव्याख्याता

येत्या काळात रोजगारांच्या संधी वाढविण्यासाठी कौशल्याभिमुख शिक्षणपद्धती आणण्यावर भर द्यावा. मुळात अनुभवावर आधारित शिक्षणपद्धती तयार करण्याची गरज आहे. केवळ नव्या संस्था आणि इतर गोष्टी केल्यातरी, त्या अपुऱ्या ठरतात. तेव्हा सर्वप्रथम तो निधी पूर्णपणे खर्च होण्याची गरज आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 
-संजय नाथे, नाथे करिअर अकादमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com