उन्हामुळे वाढते कमाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नागपूर - पारा 45 डिग्रीवर. अंगाची लाहीलाही करणारे ऊन. शरीरातून घामाच्या वाहत्या धारा. अशा परिस्थितीत फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था काय होते, हे ज्याचे त्यालाच ठाऊक. उदरनिर्वाहासाठी अख्खे ऊन अंगावर घेणारे दुकानदार शहरात जागोजागी पाहायला मिळतात. गंगाराम रांगो त्यापैकीच एक. उन्हाची पर्वा न करता केवळ कुटुंबासाठी ते रक्‍ताचे पाणी करीत आहेत. 

60 वर्षांचे गंगाराम मूळचे आंध्र प्रदेशचे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते जपानी गार्डनजवळ निरा व थंडगार नारळपाणी विकतात. छोटीशी कॅन भरून नारळपाणी व निरा आणतात. सकाळी सातपासून दुपारी दोनपर्यंत त्यांचा धंदा चालतो. उन्हामुळे घामाघूम झालेले वाटसरू हमखास गंगाराम यांच्याजवळ थांबून एक ग्लास थंडगार व स्वादिष्ट नारळपाणी पिऊनच पुढे जातात. नारळपाणी शरीरासाठी आरोग्यदायी असल्याने कारवालेसुद्धा नारळपाण्याचा आनंद घेतात, अशी माहिती त्यांनी दिली. दररोज चारशे ते पाचशे रुपयांची त्यांची कमाई होते. यातील काही रक्‍कम ठेकेदाराला दिल्यानंतर दोन-तीनशे रुपये वाचतात. चार महिने कमाई केल्यानंतर ते परत आंध्र प्रदेशचा मार्ग धरतात. 

इतरांप्रमाणे गंगारामही उन्हामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे गिऱ्हाईक नसले की ते झाडाचा आसरा घेतात. फुटपाथवर धंदा करणाऱ्या अनेक दुकानदारांना उन्हाचा फटका बसत आहे. मात्र, गंगाराम यांच्यासाठी ऊन एकप्रकारे कमाईची सुवर्णसंधीच आहे. कारण जेवढे ऊन तापेल, तेवढे अधिक गिऱ्हाईक त्यांच्याकडे येतील. 

Web Title: Increasing earnings due to summer