अपक्ष, बसपने दिले प्रस्थापितांना धक्के 

file photo
file photo

नागपूर : शहरात सहाही मतदारसंघात तसेच त्यापूर्वीच्या पाचही मतदारसंघांत अपक्षांना आतापर्यंत विजय मिळविता आला नाही. परंतु, अपक्षांसह बसप व भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्के देत आपले उपद्रव मूल्य सिद्ध केले. अपक्षामुळे माजी मंत्री अनीस अहमद यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. तर आताचे भाजपचे आमदार डॉ. मिलिंद माने 2009 मध्ये अपक्ष होते. त्यांच्यामुळे भाजपला उत्तरेत विजयासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. डॉ. मिलिंद माने यांनीच भाजपच्या पारड्यात विजय खेचून आणला, हे विशेष. 
मागील 2014 मधील विधानसभा निवडणुकीत शहरातील सहा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत थेट लढत झाली. विजयी भाजप उमेदवारांनी निकटच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मोठ्या अंतराने विजय मिळविला. मात्र, उत्तर नागपुरात तिरंगी लढत झाली. यात बसपने कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकले. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना 68 हजार 905 मते मिळाली. या निवडणुकीत बसपचे किशोर गजभिये यांना 55 हजार 187 मते मिळाली. त्यामुळे कॉंग्रेसच्या नितीन राऊत यांना 50,042 मतांसाठी तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. येथे बसपने कॉंग्रेसचे प्रस्थापित डॉ. राऊत यांना धक्का दिला. 2009 मध्ये मध्य नागपुरात प्रथमच आमदार होण्यासाठी उभे असलेले तत्कालीन नगरसेवक विकास कुंभारे यांनी कॉंग्रेसच्या डॉ. राजू देवघरे यांचा 10 हजार 769 मतांनी पराभव केला. येथे बसपचे गनी खान यांनी 24 हजार 18 मते घेतली. मात्र, यात गनी खान यांनी मुस्लिम मते मोठ्या प्रमाणात घेतल्याने कॉंग्रेस उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकली नाही. याच निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत पश्‍चिम नागपुरात झाली. भाजपचे सुधाकर देशमुख केवळ 1943 मतांनी निवडून आले. कॉंग्रेसच्या अनीस अहमद यांना 57 हजार 830 मते मिळाली तर देशमुख यांना 59 हजार 830 मते पडली. या निवडणुकीत अपक्ष व कॉंग्रेसचे बंडखोर नितीश ग्वालवंशी यांनी 12 हजारांवर मते घेतली होती. त्यांच्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे अनीस अहमद यांची विधानसभा वारी थोडक्‍यात हुकली. उत्तर नागपुरात कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत विजयी झाले. भाजपचे राजेश तांबे यांना 17 हजार 992 मतांनी पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत आताचे भाजपचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी अपक्ष असतानाही 23 हजार 662 मते घेतली. त्यामुळे भाजपला येथे विजयासाठी प्रतीक्षा करावी लागली. 2004 मध्ये दक्षिणेत तत्कालीन आमदार भाजपचे मोहन मते यांना कॉंग्रेसचे गोविंदराव वंजारी यांनी पराभूत केले होते. वंजारी यांच्या विजयाचे अंतर 9 हजार 32 मतांचे होते. या निवडणुकीत भारिपचे राजू लोखंडे यांनी 12 हजार 56 मते घेतली होती तर बसपचे किरण पांडव यांनी 26 हजारांवर मते घेतली होती. या दोघांनी विशेषतः राजू लोखंडे यांच्या उमेदवारीने मते यांच्या आमदारकीच्या दुसऱ्या टर्मला "ब्रेक' लावला. त्यानंतर मोहन मते आता भाजपच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. नागपूर पश्‍चिममधून माजी मंत्री राज्यातील दिग्गज कॉंग्रेस नेते रणजित देशमुख यांनी नशीब आजमावले होते. त्यांचा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 हजार मतांनी पराभव केला होता. येथे बसप उमेदवार प्रशांत पवार यांनी 14 हजार 355 तर दहा अपक्ष उमेदवारांनी सात हजार मते घेतली होती. त्यामुळे रणजित देशमुख यांना पुन्हा विधानसभेत जाता आले नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com